

सातारा : घरगुती वापराचा गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्सीच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरेंट्स, खानावळी तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे मात्र घरगुती सिलेंडरचा काळाबाजार फोफावला आहे. दिवाळीसारख्या सणात गैरसोय होत असल्याने ग्राहकांना सिलिंडरसाठी फरफट सुरू आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या कारवाया, तपासणी मोहिमा थंडावल्याने गॅस एजन्सीचालक-मालकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणाबाबत काही एजन्सींसंदर्भात तक्रारी वाढल्या आहेत. नोंदणी करुनही सिलिंडर वेळेवर मिळत नाही. विचारणा केल्यास ‘साठा’ नाही, गाडी आली नाही अशी उत्तरे देऊन ग्राहकांना वाटेला लावले जात आहे. अनेक ग्राहकांना दोन-तीन वेळा एजन्सीकडे चकरा माराव्या लागत आहेत. याच काळात शहरातील आणि तालुक्यांतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळी व रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे घरगुती सिलिंडर वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. व्यावसायिक वापरसाठी स्वतंत्र सिलेंडर असताना घरगुती सिलिंडर वापरणे नियमबाह्य आहे.
घरगुती सिलिंडर अनुदानित आणि कमी दराचा असल्याने काळ्या बाजारात त्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वाट्याचा साठा बाहेर जात असल्याचा संशय बळावला आहे.अशा गैरप्रकारांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा विभागाची आहे. मात्र, अलिकडच्या काळात एजन्सींची तपासणी, हॉटेल-खानावळींवरील धाडी आणि साठ्याची पडताळणी अशा कारवाया थंडावल्याने गॅस एजन्सीजचालकांची मनमानी वाढली असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या आहेत. परिणामी एजन्सी चालकांवर अंकुश राहिलेला नाही. तक्रारींचे निराकरण वेळेत होत नाही, हीदेखील त्रुटी आहे. सिलिंडर वितरणाची नोंद आणि प्रत्यक्ष साठा यांची नियमित तपासणी झाल्यास गैरप्रकार उघड होऊ शकतात.
सणासुदीच्या काळात स्वयंपाकसाठी गॅस मिळणे ही मुलभूत गरज आहे. सिलिंडर न मिळाल्याने गृहिणींना पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. या झंझटीमुळे ग्रामीण भागात तर पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. मात्र शहरी भागात करायचे काय, असा प्रश्न गृहिणींपुढे ठाकला आहे. नोकरदार, काम करणार्या गृहिणींना सुट्टी, रजा घेऊन सिलेंडरसाठी एजन्सीमध्ये जावे लागत आहे. अनेकांना जादा पैसे देऊन सिलिंडर घ्यावा लागत असल्याच्या तक्रारीही आहेत. वृद्ध, एकल महिला आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना सर्वाधिक फटका बसत आहे.
ग्राहकांना पडले आहेत ‘हे’ प्रश्न...
गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील किती गॅस एजन्सींची तपासणी केली व त्यामध्ये काय आढळले? घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्या किती हॉटेल्स व खानावळींवर कारवाई केली? ग्राहकांना वेळेत सिलेंडर न देणार्या किती एजन्सीजना नोटीस दिली किंवा दंड केला? प्रत्येक एजन्सीला मिळणारा साठा आणि प्रत्यक्ष वितरण यांची पडताळणी करून त्याचा अहवाल तयार केला जातो का? असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या कारवाया थंडावल्याने ग्राहकांची प्रचंड फरफट सुरू आहे. तक्रारी असतानाही दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.