

सातारा : सदरबझार येथे असलेल्या फिजिओटेक क्लिनिकमधील डॉ. आदिश रमेश पाटील याने पेशंट म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. फोटोबाबत कोणाला सांगितल्यास इंजेक्शन देऊन मारून टाकण्याची धमकीही डॉक्टरने दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 23 जून व 3 जुलै रोजी घडली आहे. पीडित तक्रारदार मुलगी अल्पवयीन असून ती थेरपी करण्यासाठी डॉ.आदिश पाटील याच्याकडे जात होती. पेशंटवर उपचार सुरु असताना डॉक्टरने पेशंट मुलीचे कंबरेचे, छातीचे उघड्या अवस्थेतील फोटो काढले. हे सर्व फोटो डॉक्टरने मुलीला दाखवून याची कोणाला माहिती दिली तर तुला इंजेक्शन देवून मारुन टाकीन, असे म्हणत धमकावले. यामुळे मुलगी घाबरली. याचा गैरफायदा घेत डॉक्टरने मुलीसोबत अश्लिल चाळे केले. या सर्व घटनेमुळे मुलगी अधिकच घाबरुन गेली.
डॉक्टरने केलेल्या या सर्व कृत्यामुळे मुलगी कोणाशीच बोलत नव्हती. मुलगी शांत राहत असल्याचे पाहून कुटुंबियांना शंका आली. मुलीला विश्वासात घेवून तिच्याशी चर्चा केल्यानंतर तिने डॉक्टरने केलेल्या गैरकृत्याची माहिती दिली. यानंतर कुटुंबियांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन डॉ.आदिश पाटील याच्याविरुध्द विनयभंग, पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, डॉक्टरविरुध्द पोक्सोचा गुन्हा दाखल झाल्याने सातार्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.