

सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मुंबई उच्च न्यायालय व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश डीजे वाजवणाऱ्या तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर सातारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शाहूपुरी व सातारा शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दि. २४ रोजी १५, तर दि. २५ रोजी १४ अशा एकूण २९ गणेश मंडळांशी संबंधित चालक, डीजे मालक व अन्य संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दि. २४ रोजीच्या कारवाईत सुमारे २ कोटी ५० लाख रुपये किमतीचा डीजे सिस्टीम व वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीपूर्वी गणेश मंडळे आणि डीजे मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, दि. २४ व २५ रोजीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळांकडून या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित मंडळांचे चालक, डीजे मालक व अन्य संबंधितांवर गुन्हे दाखल करून डीजे सिस्टीम आणि वाहने जप्त करण्यात आली.
दि. २४ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२, तर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हे दाखल झाले. यामध्ये जय शिवराय मित्र मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, शाहूपुरी गणेश मंडळ, विठ्ठलनगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळ, श्रियश गणेशोत्सव मंडळ, सुयोग गणेशोत्सव मंडळ, एकता गणेशोत्सव मंडळ, बालस्मृती गणेश मंडळ, संघर्ष मित्रमंडळ, शिवनगर गणेशोत्सव मंडळ व शिवतेज गणेशोत्सव मंडळ यांचा समावेश आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाल गणेश तरुण मंडळ, अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ व भोसलेनगर गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्यात आली.
यातील संबंधित डीजे मालक, वाहनचालक तसेच डीजे स्ट्रक्चर तयार करणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सातारा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश तांबे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पथकाचे कौतुक केले.