Satara News : जिल्ह्यात ४५ गावे व २७९ वाड्या तहानलेल्या

सुमारे ४३ टँकरने पाणीपुरवठा : आणखी टँकर वाढण्याची शक्यता
Water Scarcity
जिल्ह्यात ४५ गावे व २७९ वाड्या तहानलेल्या
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्ह्यात पावसाळा सुरू असतानाही काही भागात पाणी टंचाईचे संकट कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ४५ गावे आणि २७९ वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईची तीव्र झळ बसत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. दिवसेंदिवस कडक ऊन पडत असल्याने टँकर आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या कडक ऊन जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या काही गावांमधील विहिरी, कूपनलिका तसेच अन्य पाणीपुरवठा स्त्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी नियमीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभूखेड, वरकुटे म्हसवड, शिरताव, रांजणी, धुळदेव, पळशी, मार्डी, इंजबाव, भालवडी, वाकी, विरळी, कुरणेवाडी, वारूगड, परकंदी, टाकेवाडी, सुरूपखानवाडी, दोरगेवाडी, पुकळेवाडी, कुकुडवाड यासह ३५ गावे व २३९ वाड्या-वस्त्यांमधील ५६ हजार १५७ नागरिक व ५१ हजार ६७२ जनावरांना ३५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यातील मोराळे, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, यलमरवाडी, गारवडी (आवळेपठार) पडळ यासह ७ गावे व ३६ वाड्यांमधील ७ हजार ८३३ नागरिक व २ हजार १३५ जनावरांना ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, सासवड (माळीबेंद), गोळेगाव या तीन गावांमधील २२२२ नागरिक व १०१५ जनावरांना चार टँकरने पाणीपुवठा केला जात आहे.

सध्यस्थितीत १६ विहिरी व ९ कूपनलिका पाणीपुरवठा विभागाने अधिगृहीत केल्या आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासह उपलब्ध जलस्त्रोतांचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच अगामी काळात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.त्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news