

सातारा : साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे ९७ नवीन उद्योगांची उभारणी होणार असून, त्यातून चार हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आणि सात हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. आगामी काळात उद्योगांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.
सातारा, कराड, वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कोरेगाव आणि पाटण येथील एमआयडीसीमध्ये सध्या पाच हजारांहून अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. या औद्योगिक पट्ट्यात नव्या गुंतवणुकीची भर पडणार आहे. गोदरेज ५०० कोटी, इंजिन ग्लोबल ५५० कोटी, डेलवल फ्लो कंट्रोल्स ३५० कोटी, इंयंत्र टेक्नॉलॉजी २५० कोटी, आशीर्वाद इंडस्ट्रियल १५० कोटी, श्री अष्टविनायक ग्लास १५० कोटी, कुइब्लेर ऑटोमोबाइल १०५ कोटी आणि मालाज फूड प्रॉडक्ट १०० कोटी, यांसह ९७ कंपन्यांचा प्रस्तावित उद्योगांमध्ये समावेश आहे.
नव्या उद्योगांमध्ये सुमारे १० टक्के मोठे, २० टक्के मध्यम, ३० टक्के लघु आणि ३० टक्के सूक्ष्म उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांमुळे थेट रोजगाराबरोबरच वाहतूक, पुरवठा साखळी, कंत्राटी कामगार, हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ आणि विविध सेवा क्षेत्रांनाही मोठी चालना मिळणार आहे.