

सातारा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि दिग्गज नेते अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातामध्ये बारामती येथे निधन झाले. त्यांच्यावर दि. 29 जानेवारी रोजी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे. दादांच्या एक्झिटमुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन दुसऱ्या दिवशीही सुन्न झाले होते. जिल्ह्याच्या विविध भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. तसेच अनेकांनी दादांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीकडे धाव घेतली. ठिकठिकाणी शोकसभा घेवून सातारकरांनी अजितदादांना श्रध्दांजली वाहिली.
या दु:खद घटनेमुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटाजाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी बारामतीच्या दिशेने धाव घेतली. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन मिळावे, या हेतूने बारामतीत जमलेल्या लाखोंच्या जनसागराचा सातारकरही भाग होवून गेले. अनेकांनी टीव्हीवरुन मोबाईल फोनवरुही अंत्यसंस्काराचा कार्यक्रम डोळ्यांत साठवून घेतला. हा कार्यक्रम पाहतानाही घराघरात हुंदके दाटून आल्याचे पहायला मिळाले. लोक हुमसून हुमसून रडताना पहायला मिळाले.
जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि बाजारपेठांच्या गावांतील व्यापारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. बाजार समित्यांमधील व्यवहारही ठप्प झाले होते. व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपली दुकाने बंद ठेवली होती. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आल्या. अजितदादा पवार यांनी सहकाराला वेगळी दिशा दिली. स्वत: निर्व्यसनी राहून आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते व्यसन करु नका, असा संदेश वारंवार देत असत. अजितदादांच्या कामाची पध्दत अतिशय वेगवान अशी होती. सकाळी लवकर उठून ते कामाला सुरुवात करायचे. लोकांची कामे हाती घ्यायचे. राज्यातील सहकारी संस्था जगल्या पाहिजेत, गोरगरीबांना त्याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी अजितदादांनी आयुष्यभर प्रयत्न केले. एका बुलंद नेत्याच्या अकाली निधनामुळे राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा प्रतिक्रिया शोकसभांमध्ये व्यक्त झाल्या.
मेढा परिसर दादांसाठी हळहळला...
मेढा : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजितदांदाना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने मेढा ग्रामस्थ व रहिवासी, व्यापारी संघाच्यावतीने मेढा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता मेढा शहर पूर्णपणे बंद असल्याने सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत होता. अजितदादा यांच्या आपघाती निधनाचे तालुक्यात सगळीकडे पडसाद उमटले. दोन दिवस तालुक्यातील सर्व नेतेमंडळी, तालुक्याची जनता शोकसागरात होती. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराचा जोरही दोन दिवस पूर्णपणे बंद होता. मेढ्यात सकाळी 11 वा. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय, अशा विविध पक्षांनी श्रध्दांजली वाहिली. करहर विभागात सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी दांदाना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर मेढा शहर व परिसरात ग्रामस्थांनी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.