

सातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. मात्र अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. हवामान विभागाने सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने कोयना, कण्हेर, उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
मंगळवारी जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे कोयना धरणाच्या विद्युत गृहातून 1 हजार 50 क्युसेक, कण्हेर धरणाच्या विद्यूत गृहातून 700 क्युसेक्स तर सांडव्यातून 1 हजार क्युसेक्स असे मिळून 1 हजार 700 क्युसेक्स पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणाच्या सांडव्यातून 500 क्युसेक्स, विद्यूत गृहातून 1 हजार 691 क्युसेक्स असे मिळून 2 हजार 191 क्युसेक्स नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दि. 2 व 3 जुलै रोजी जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट तर दि. 4 जुलै रोजी घाट परिसरात यलो अलर्ट दिला आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी अद्यापही शेतात पाणी साचले असल्याने मशागती व पेरणीसाठी वाफसा येत नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत तर काही ठिकाणी पेरणीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 10.30 पर्यंत सातारा 7.8 मि.मी., जावली 21. 7 मि.मी., पाटण 21.6 मि.मी., कराड 6.1 मि.मी., कोरेगाव 6.3 मि.मी., खटाव 3.1 मि.मी., माण 2.1 मि.मी., फलटण 2 मि.मी., खंडाळा 3 मि.मी., वाई 7.7 मि.मी.,महाबळेश्वर 70.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.