सातारा : ‘गरिबांचे आरोग्य मंदिर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयात एका मद्यधुंद तरुणीच्या उपदव्यापामुळे अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक त्रस्त झाले आहेत. दिवसभरात पाचशेहून अधिक रुग्णांची वर्दळ असलेल्या या रुग्णालयाच्या परिसरात संबंधित तरुणी २४ तास राडा करत असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्ण कक्षांमध्ये जाऊन गोंधळ घालणे, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे तसेच स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकारांमुळे रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
संबंधित तरुणी मद्यप्राशन करून रुग्णालयात येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तिच्याकडे दारूच्या बाटल्या आणि ब्लेड असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयातील विविध कक्षांमध्ये जाऊन ती गोंधळ घालत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्येही अस्वस्थता निर्माण होत आहे. तरुणीला रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी पुरुष कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक गेल्यास ती स्वतःचे कपडे फाडून घेते तसेच ब्लेडने स्वतःवर वार करून घेण्याचा प्रयत्न करते, असा आरोप आहे.
महिला कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक तिला समजावण्यासाठी गेल्यास त्यांचे कपडे फाडण्याचा प्रकारही घडत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अनेक वेळा भिंतीवर डोके आपटून घेण्याचाही तिने प्रयत्न केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकाराबाबत जिल्हा रुग्णालयातील विविध कक्षांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे दिल्या आहेत. रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याबाबत अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्याकडे तक्रार केली असून, संबंधित तरुणीवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठोस कारवाई करणे गरजेचे
जिल्हा रुग्णालयात दररोज ५०० हून अधिक रुग्णांची वर्दळ असते. मद्यधुंद तरुणीच्या वारंवारच्या गोंधळामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. रुग्ण कक्षांमध्ये जाऊन ती राडा करत असल्याच्या तक्रारी आहेत. तिच्याकडे दारूच्या बाटल्या व ब्लेड असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना विरोध करताना ती स्वतःला इजा करून घेते. महिला कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केल्याच्या तक्रारी आहेत. अनेकदा भिंतीवर डोके आपटून घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी तिला पुणे येथील मानसिक आरोग्य रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, ठोस कारवाई करणे गरजेचे आहे.