Satara News: जिल्ह्यात अडीच लाख लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद

ई-केवायसी रखडल्याचा फटका : ३० सप्टेंबर अंतिम मुदत
Ration
Rationpudhari photo
Published on
Updated on

सातारा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशन धान्याचा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार ६२० ग्राहकांची ई-केवायसी रखडल्याने त्यांना धान्याला मुकावे लागणार आहे. २० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे धान्य कायमचे बंद होण्याची शक्यता आहे. ई-केवायसीमध्ये फलटण तालुका पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकेतील प्रत्येक लाभार्थ्याची अचूक ओळख पटवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. सातारा जिल्ह्यात ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळणार नाही. ई-केवायसी करण्यासाठी जिल्ह्यात १७ लाख ३७ हजार ४८८ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये अकरा तालुक्यांत १४ लाख ८९ हजार ८६८ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली. त्याची टक्केवारी ८५.७५ इतकी आहे.

मात्र, यामध्ये अद्याप २ लाख ४७ हजार ६२० लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नाही. ई-केवायसीमध्ये फलटण तालुका सर्वात मागे असून ८१.१ टक्के काम झाले आहे. ई-केवायसी ३० सप्टेंबरपर्यंत करायची असल्याने मुदत संपण्यासाठी फक्त आठ दिवसांचाच कालावधी राहिला आहे. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची संबंधित गावातील रास्त भाव धान्य दुकानदाराकडे यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी त्या-त्या रेशन धान्य दुकानदारांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

ई-केवायसी न झालेले तालुकानिहाय लाभार्थी

जावली तालुक्यात ११ हजार, कराड तालुक्यात ५० हजार २८, खंडाळा तालुक्यात ८ हजार २९२, खटाव तालुक्यात २३ हजार ६६३, कोरेगाव तालुक्यात १५ हजार ७३०, महाबळेश्वर तालुक्यात ४ हजार १७८, माण तालुक्यात २१ हजार ५१५, पाटण तालुक्यात २९ हजार ८२६, फलटण तालुक्यात ३४ हजार ३६६, सातारा तालुक्यात ३६ हजार ६४६, वाई तालुक्यात १२ हजार ३७६ अशी लाभार्थ्यांची ई-केवायसी होणे बाकी आहे.

ई-केवायसी करण्यासाठी जिल्ह्यात दि. २८ ते २९ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सेवा सेतू कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये ई-केवायसी पूर्ण करणे, रेशन कार्डशी मोबाईल लिंक करणे, तक्रार निवारण आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांनी मुदतीत ई-केवायसी करून सहकार्य करावे,
- वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news