

सातारा : सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्यावतीने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी प्लास्टिक विघटन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 3 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक योजनेसाठी झेडपीचा पुढाकार वाखाणण्याजोगा आहे.
ग्रामीण व शहरी भागात सर्वत्र प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात कचरा पहावयास मिळत आहे. या कचऱ्यामुळे बकाल स्वरूप आले आहे. कचऱ्याचे मोठ-मोठे ढिग लागत असल्याने या कचऱ्याने सर्वत्र दुर्गंधी पसरु लागली आहे. ग्रामपंचायतींनी कचरा हटवला तरी पुन्हा त्या जागी कचऱ्याचे ढिग निर्माण होत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यावर कारवाईचा बडगाही उगारला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्यामुळे नाले तुंबण्याचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय मोकाट जनावराच्या आरोग्यासह धोकाही उद्भवत आहे.
पर्यावरणास हातभार लावण्यासाठी प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात तरडगाव ता. फलटण, पाचवड ता. वाई, मल्हारपेठ ता. पाटण, पुसेगाव ता. खटाव व वाठारस्टेशन ता. कोरेगाव या 5 ठिकाणी प्लास्टिक विघटन केंद्र उभारण्यात येणार आहेत. या परिसरातील ग्रामपंचायत व परिसरातून प्लास्टिक कचरा संकलन करुन त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील प्लास्टिक कचऱ्यामुळे येणारा बकालपणा कमी होण्यास मदत होणार आहे.