Satara News: जिल्ह्यातील धरणांमध्ये 124 टीएमसी पाणीसाठा

आठ धरणांतून आवर्तने सुरू; 4 हजार 951 क्युसेकचा विसर्ग
Satara News: जिल्ह्यातील धरणांमध्ये 124 टीएमसी पाणीसाठा
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. मोठे व मध्यम प्रकल्प असलेली धरणे 60 टक्केहून अधिक भरली, त्यामध्ये 124 टीएमसी पाणीसाठा आहे. पिण्यासाठी, सिंचनासाठी तसेच विजनिर्मितीसाठी आठ धरणांतून 4 हजार 951 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सध्या पिण्याच्या पाण्याबाबतची चिंता नसली, तरी उन्हाळा लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठा धरण प्रकल्प असलेल्या कोयना धरणात सध्या 69.85 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. कोयना धरणाची एकूण क्षमता 105.25 टीएमसी असून, सध्या ते सुमारे 66 टक्के भरलेले आहे. कोयना धरणावर सांगली जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र व राज्याच्या वीजनिर्मितीचा मोठा भाग अवलंबून असल्यामुळे हा धरणसाठा महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय उरमोडी धरणात 7 टीएमसी पाणी असून ते सुमारे 70 टक्के भरलेले आहे. तसेच कण्हेर धरणात 6.85 टीएमसी पाणी असून, त्यामध्ये सुमारे 67 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धोम धरणात 7.40 टीएमसी पाणीसाठा असून ते सुमारे 54 टक्के भरलेले आहे.

धोम-बलकवडी धरणात 2.27 टीएमसी पाणी असून त्यामध्ये सुमारे 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तारळी धरणात सर्वात कमी पाणीसाठा आहे. या धरणाची एकूण क्षमता 5.85 टीएमसी असून त्यामध्ये सध्या 2.34 टीएमसी पाणी आहे. म्हणजेच या धरणात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातील लाभक्षेत्रात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणारा आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये निरा-देवघर धरणात 7.58 टीएमसी पाणी असून त्यामध्ये 63 टक्के पाणीसाठा आहे. भाटघर धरणात 15.97 टीएमसी पाणी असून ते सुमारे 67 टक्के भरले आहे. तसेच वीर धरणात 5.28 टीएमसी पाणी असून सुमारे 53 टक्के पाणीसाठा आहे.

मोठ्या व मध्यम प्रकल्पांचा विचार करता जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या एकूण सुमारे 124 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये चांगला साठा निर्माण झाला असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला परिस्थिती तुलनेने स्थिर आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात वाढ होत असल्याने पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच सिंचनासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यावरही जलसंपदा विभागाने भर दिला आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असला तरी आगामी उन्हाळा लक्षात घेता पाण्याचा वापर जपून करावा लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

जिल्ह्यातील धरणांमधून पिण्यासाठी, सिंचनासाठी तसेच विजनिर्मितीसाठी आवर्तने सुरु करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही धरणांतून विजनिर्मितीसाठीही विसर्ग करण्यात येत आहे. त्यामध्ये कोयना विद्युत गृहातून 2 हजार 100 क्युसेक्स, धोम धरणातून विद्युतगृहासाठी 280 क्युसेक, सिंयन द्वारातून 489 क्युसेक, उजवा कालवा 190 क्युसेक, डावा कालवा 565 क्युसेक, आसरे 450 क्युसेक; धोम बलकवडी धरणातून नदी विसर्ग 8 क्युसेक्स, इतर 328 क्युसेक; कण्हेर धरणातून विद्युत गृह 340 क्युसेक, सिंचन द्वार 40 क्युसेक, उजवा कालवा 180 क्युसेक, डावा कालवा 200 क्युसेक; उरमोडी धरणातून नदी विसर्ग 55 क्युसेक, विद्युत गृह 550 क्युसेक, डावा कालवा 495 क्युसेक, तारळी धरणातून उजवा कालवा (कोपर्डे) 124 क्युसेक, इतर 326 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

मध्यम प्रकल्पातील येरळवाडी उजव्या कालव्यातून 24 व डाव्या कालव्यातून 18 क्युसेक तसेच नेर धरणाच्या डाव्या कालव्यातून (आंधळी) 70 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. मोठे व मध्यम प्रकल्पातून एकूण 4 हजार 951 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news