Satara DCC Bank Election : महायुतीच्या जागावाटपाचा मुहूर्त लांबला

ना. शिवेंद्रराजे लातूर दौऱ्यावर तर ना. मकरंद पाटील मुंबईत
Satara DCC Bank
Satara DCC Bank Pudhari photo
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाचा घटस्थापनेचा मुहूर्त हुकला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील तीन पक्षांच्या नेत्यांची रविवारी एकत्रित बैठक होणार होती. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मदत व पुनर्वसन विभागाची बैठक बोलावली. त्याचवेळी पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करण्याच्या सूचना देण्यात आल्याने जागावाटपाची बैठक लांबणीवर पडली. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील मुंबईत, तर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले लातूर दौऱ्यावर असल्याने महायुतीच्या चर्चेचे घोडे पुन्हा अडले आहे.

जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदांसाठी १६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी वाई सोसायटी मतदारसंघासह गृहनिर्माण व दूध या दोन मतदारसंघांतील जागा जवळपास बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १९ जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. यातील १० सोसायटी मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढती करण्याचे नियोजन आहे, तर अन्य नऊ जागांवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील चर्चेतून उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार आहे. या नऊ जागांवर अनेक दिग्गजांनी दावेदारी केल्याने महायुतीच्या नेत्यांसमोर उमेदवार निश्चित करण्याचे मोठे आव्हान आहे.

दरम्‍यान, दुष्काळासंदर्भातील बैठकीसाठी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील हे मुंबईत होते. त्याचवेळी पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सूचनांनुसार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी लातूर जिल्ह्याचा दौरा केला. परिणामी, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी होणारी महायुतीच्या नेत्यांची बैठक रद्द करावी लागली. आता ही बैठक पुन्हा कधी होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news