

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असून, घटक पक्षांमध्ये एकमत होण्याऐवजी स्वतंत्रपणे राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपापल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी स्वतंत्र चर्चा आणि रणनीती आखली जात आहे. त्यामुळे महायुतीची एकजूट कायम राहणार की घटक पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दि. २१ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून तोपर्यंत जागावाटपाबाबत जोरदार खल चालणार आहे.
महायुतीच्या नेत्यांच्या बैठका आणि चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्या, तरी त्यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवसेनेकडून आ. रामराजे ना. निंबाळकर आणि शेखर गोरे यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. भाजपमध्येही ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे यांच्यासह नेत्यांनी पक्षाच्या वाट्याला अधिकाधिक जागा कशा मिळतील, यावर विचारविनिमय केला आहे. भाजपने जागावाटपाच्या चर्चेचे सर्वाधिकार ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सोपवले आहेत. त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक झाली. मात्र, या बैठकांनंतरही जागावाटपाचा गुंता कायम आहे.
अकरा तालुक्यांतील ११ सोसायटी मतदारसंघ स्वबळावर लढण्याचा निर्णय यापूर्वीच स्पष्ट झाला आहे. मात्र, कृषी प्रक्रिया, महिला राखीव, नागरी बँका-पतसंस्था, औद्योगिक संस्था व मजूर, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त आणि इतर मागास प्रवर्गातील जागांवर अद्याप एकमत झालेले नाही. वाई सोसायटीतून खा. नितीन पाटील आणि गृहनिर्माण व दूधमधून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले असे दोन उमेदवार बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, खरेदी-विक्री संघामध्ये ना. मकरंद पाटील यांच्याविरोधात विश्वासराव निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज ठेवून भाजपने राखीव जागांसाठी दबावतंत्र वापरल्याची जोरदार चर्चा आहे.
अनुसूचित जाती-जमाती व महिला राखीवची जागा ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडे ठेवण्याची रणनीती आखली जात आहे. ही जागा भाजप सोडणार नसल्याची भूमिका पक्षाकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गासह महिला राखीवची आणखी एक जागाही भाजपकडे ठेवण्यासाठी राजकीय डावपेच सुरू आहेत.
कृषी प्रक्रिया मतदारसंघात जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आ. रामराजे ना. निंबाळकर, भाजपचे आ. डॉ. अतुल भोसले, राजेंद्र भोईटे, राजश्री देशमुख आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या जागेवर आ. रामराजेंनी दावा केला आहे. दुसरीकडे ही जागा भाजपला मिळावी, यासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले व ना. जयकुमार गोरे यांनी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीतील जागावाटपाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
नागरी बँका-पतसंस्था मतदारसंघात महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विद्यमान संचालक रामराव लेंभे यांच्यासह आ. मनोज घोरपडे, आ. धैर्यशील कदम यांच्यासह १८ जणांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कुणाला संधी मिळणार? याकडे लक्ष आहे. हीच परिस्थिती महिला राखीव मतदारसंघात असून येथील दोन जागांसाठी २२, तर राखीवमध्येही १२ जण इच्छुक आहेत. शिवसेनेचे नेते शेखर गोरे, विद्यमान संचालक प्रदीप विधाते, प्रतीक विधाते, योगेश फडतरे, सुरेंद्र गुदगे यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केलेल्या ओबीसी मतदारसंघातही गर्दी झाली आहे. तर विमुक्त भटक्या जातीतही चुरस दिसून येत आहे.