Satara Politics : बाबा-आबा पहिल्यांदाच एकत्र ‘बसले’

जिल्हा बँकेबाबत महायुतीसाठी प्राथमिक बोलणी; वारंगुळा कायम टिकण्याची चिन्हे
Satara Politics : बाबा-आबा पहिल्यांदाच एकत्र ‘बसले’
Published on: 
Updated on: 
हरीश पाटणे

सातारा : गेले कित्येक महिने सातारा जिल्हा बँक या विषयावर एकमेकांशी अजिबात वार्तालाप न करणारे भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व राष्ट्रवादीचे नेते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील रविवारी अखेर एकत्र बसले. बँकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून पुढे जाण्याच्यादृष्टीने दोन्ही नत्यांमध्ये प्राथमिक बोलणी झाली.

निवडणुकीत दोन पॅनल पडणार की महायुती म्हणून सगळे एकत्र राहणार? याविषयी महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची उत्सुकता आहे. भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी निवडणूक राजकारणविरहित करण्याचा सल्ला देत एक पाऊल पुढे टाकले. बँकेत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा, असा इशाराच उदयनराजेंनी सर्वपक्षीय नेत्यांना दिला होता. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर बँकेबाबत प्रमुख नेत्यांची वेगवेगळी विधाने समोर आली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसंगी भाजप म्हणून निवडणुकीला सामोरे जावू, असे विधान करत गरज पडली तर मित्र पक्षांशी चर्चा करू, असे सांगून निवडणुकीतला ट्विस्ट जिवंत ठेवला.

शनिवारी रात्री मंत्री शिवेंद्रराजे , मंत्री गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांनी भाजप अंतर्गत प्राथमिक चर्चा केली आणि निर्णयाचे सर्वाधिकार शिवेंद्रराजे यांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या चर्चेचा उहापोहही या बैठकीत झाला. बँकेवर भाजपच्या विचारांचे लोक जास्त असले पाहिजेत, यावर चर्चा झाली. त्याचवेळी महायुतीतील मित्र पक्षांशी शिवेंद्रराजे यांनी बोलावे, असे ठरले.

बँकेत शिवेंद्रराजे व मकरंदआबा यांचा वारंगुळा आहे. तरीही जिल्हा परिषदेत घडलेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर बँकेबाबत या दोनही नेत्यात कोणताही वार्तालाप झाला नव्हता. ‘बाबा-आबा’ एकत्र यावेत, ही जनभावना बँकेच्या वर्तुळात आहे. त्यासाठी स्व. अभयसिंहराजे भोसले व स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या मैत्रीचेही दाखले दिले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अबोल असलेले दोन्ही नेते अखेर रविवारी एकत्र बसले. दोघांमध्ये बराच वेळ बँकेच्या निवडणुकीबाबत बोलणी झाली. महायुती म्हणून पुढे जायचे असेल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या टाळल्या पाहिजेत, याचीही चर्चा झाली. सातारा बँकेत आपण एकत्र असले पाहिजे, ही जनभावना ओळखून पुढे जाण्याबाबत चर्चा झाली.

जवळच्या मित्र पक्षांतील नेत्यांशी ज्याने-त्याने बोलण्याचे ठरले. त्यामुळे जी तणावाची परिस्थिती होती त्यातून मोकळी वाट काढणारी ही पहिली बैठक रविवारी यशस्वी झाली. पुढच्या दाेन दिवसांत तीनही पक्षातील प्रमुखांशी शिवेंद्रराजे व मकरंदआबा स्वतंत्रपणे बोलून एकत्रित फाॅर्म्युला करण्याचाही निर्णय झाल्याचे समजते. ‘बाबा-आबा’ यांचा वारंगुळा पुढे टिकतो की शिवाळ मोडली जाते याकडे जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष आहे; पण निदान हे दोघे एकत्र बसतच नव्हते ते पहिल्यांदाच बसल्याने महायुतीत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news