Satara District Bank Election : जिल्हा बँकेत राखीव जागांवर संघर्षाचे चित्र

महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच राजकीय चेकमेटची तयारी
Satara District Bank
Satara District BankPudhari Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नऊ मतदारसंघ बिनविरोध झाल्यानंतर आता उर्वरित जागांवरील राजकीय संघर्षाला वेगळे वळण मिळाले आहे. विशेषतः राखीव मतदारसंघांमध्ये महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांमध्येच एकमेकांना राजकीय चेक देण्याची रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे. वरकरणी महायुती एकत्र असल्याचे दाखवले जात असले, तरी जिल्हा बँकेच्या सत्तेतील आपापले राजकीय वजन वाढवण्यासाठी घटक पक्षांनी स्वतंत्र व्यूहरचना केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. खरेदी-विक्री संघातून ना. मकरंद पाटील, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून आ. डॉ. अतुल भोसले, गृहनिर्माण व दूध मतदारसंघातून सोमनाथ ऊर्फ काका धुमाळ, नागरी बँका व पतसंस्थांमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा सोसायटीतून सर्जेराव सावंत, खटाव सोसायटीतून नंदकुमार मोरे, वाई सोसायटीतून सत्यजित वीर, महिला राखीव मतदारसंघातून ऋतुजा पाटील आणि मंगल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

औद्योगिक विणकर व मजूर मतदारसंघात अपक्ष सुनील वाघ यांनी भाजपचे चंद्रकांत जाधव यांना पाठिंबा दिल्याने या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्रही जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, राखीव मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतचे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाले नाहीत. इतर मागास प्रवर्गाच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश फडतरे यांच्या विरोधात संदीप पाचंगणे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे राहिले आहे.

अनुसूचित जाती मतदारसंघातही बिनविरोधसाठी प्रयत्न झाले. शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून उमेदवारांची माघार घडवून आणण्यासाठी हालचाली झाल्या. रविंद्र बडेकर आणि सुरेश गायकवाड यांचा त्‍यांनी पाठिंबा मिळवला. मात्र, सत्यवान कांबळे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र पूर्णपणे निर्विवाद झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.