

खटाव : जिल्हा बॅंक निवडणूक झाली आहे. आता वाद घालायला वेळ नाही आणि मी इतका छोटा नाही. माझ्यात लढायची धमक आहे. जे घडलंय ते त्यांचे त्यांना लखलाभ असो. जी परिस्थिती आली ती स्वीकारली आहे. मी युती केली नसती, तर अर्जुन काळेंप्रमाणे आमचे सात संचालक निवडून आले असते हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही, असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना गोंदवले येथे लगावला.
बॅंकेत झालेले सॉफ्टवेअर, लॅपटॉप खरेदी गफले बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा बॅंक निवडणूक आणि पदाधिकारी निवडी झाल्यानंतर पालकमंत्री देसाई आणि मंत्री गोरे यांच्यात वाक:युद्ध सुरू आहे. दम होता, तर समोरासमोर लढायचे होते, असे गोरे यांनी वक्तव्य केल्यानंतर देसाईंनीही गणित मांडत जिल्हा स्तरावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ७ जागा निवडून आल्याचे विधान केले होते. त्यावर बोलताना मंत्री गोरेंनी आता बॅंकेची निवडणूक झाली आहे.
वाद घालायला वेळ नाही आणि मी इतका छोटा नाही. आलेली परिस्थिती मी स्वीकारली आहे. मला लढायची सवय आहे आणि लढून मी बरेच काही केले असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, जे घडलंय ते त्यांचे त्यांना लखलाभ असो. मी लढणारा आहे, रडणारा नाही. निवडणुकीवेळी माझ्या नेतृत्वाने ज्या सूचना केल्या त्या सूचनांची मी अंमलबजावणी केली. मला थांब म्हणून सांगितल्यावर मी थांबलो. नेतृत्वाने महायुती करायला सांगितल्यावर मी युती केली. मी युती केली नसती, तर अर्जुन काळेंप्रमाणे आमच्या सात जागा निवडून आल्या असत्या हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही.
आता जिल्हा बॅंक ताब्यात आहे. चांगला कारभार करू. शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू. बॅंकेत कोणते गफले झालेत ते बाहेर काढू. १०० कोटींचे सॉफ्टवेअर शोधू. १०० कोटींची लॅपटॉप खरेदी कुठे आहे ते बघू. अनेक गोष्टी आपल्याला मिळून कराव्या लागतील त्या आपण करू, असे सांगून मंत्री गोरेंनी खळबळ उडवून दिली.
मंत्री असताना दुष्काळी कामे का केली नाहीत?; शशिकांत शिंदेंवर जोरदार प्रहार!
माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी बिजवडी येथील रास्ता रोको आंदोलनात सहभागी होत ना. गोरे यांच्यावर टीका केली होती. त्याला दुष्काळी आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गोरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पाण्याबाबत एवढाच कळवळा होता, तर कृष्णा खोऱ्याचे मंत्री असताना जिहे-कठापूर आणि उरमोडी योजनांची कामे का पूर्ण केली नाहीत? या दोन्ही योजनांचा कोरेगावला फायदा होणार होता; मात्र त्यावेळी कामे झाली नाहीत. निष्क्रियतेमुळेच जनतेने तुम्हाला नाकारले, अशा शब्दांत ना. गोरे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला.