Satara District Bank : झेडपीतील वचपा काढण्‍याची जिल्‍हा बँकेत तयारी

पाडापाडीचे प्रयत्‍न उघडकीस : चेअरमन निवडीवेळी महायुती फिस्‍कटणार?
Satara District Bank
Satara District BankPudhari Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत भाजपला ९, राष्‍ट्रवादी काँग्रेसला ८ तर शिवसेनेला ४ जागा मिळाल्‍या आहेत. जरी महायुती म्‍हणायला एकत्र लढली असली तरी एकमेकांचे उमेदवार पाडण्‍याचे प्रयत्‍न झाल्‍याचे उघडकीस आले आहे. त्‍यामुळे जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या चेअरमनपदाच्‍या निवडीवेळी महायुती फिस्‍कटण्‍याची चिन्‍हे आहेत. त्‍यातच सातारा जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या निवडीवेळी जे नाटय झाले होते त्‍याचा वचपा काढण्‍याची तयारी आकडेवारीनेच दिली असल्‍याने राष्‍ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ती संधी सोडणार नाही, असे सध्‍याचे तरी चित्र आहे.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या आदेशाने सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत महायुती एकत्र आली. मात्र, सोसायटी मतदारसंघात कडव्‍या लढती झाल्‍या. अनेक ठिकाणी लक्ष्‍मीदर्शन, एकमेकांचे उमेदवार पाडापाडी, हाणामारी असे प्रसंग घडले. त्‍यामुळे महायुतीतील भाजप, राष्‍ट्रवादी काँग्रेस यांच्‍यामध्‍ये अलबेल वातावरण आहे असे चिन्‍ह नाही. निवडणुकीनंतर भाजपच्‍या ९ जागा, राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या ८ जागा तर शिवसेनेच्‍या ४ जागा आल्‍या आहेत. सातारा जिल्‍हा परिषदेवेळीही राष्‍ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र संख्‍याबळ भाजपपेक्षा जास्‍त व सत्तास्‍थापनेसाठी पुरेसे होते.

मात्र, भाजपने सत्ता हस्‍तगत केली. सत्तानाट्यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या इमारतीत हाणामारी झाली. नेते घरंगळत खाली आले. तर करंगळीलाही दुखापत झाली. त्‍यावरून राज्‍याची विधानसभा दणाणली. त्‍याचे पडसाद आजही सातारा जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत. आता जिल्‍हा बँकेवेळीही संख्‍याबळाचेही तसेच त्रांगडे झाले आहे. सर्वात मोठा पक्ष म्‍हणून भाजपला ९ जागा आहेत. जिल्‍हा परिषदेप्रमाणेही भाजप आताही ९ जागा असल्‍याने चेअरमनपदावर दावा करण्‍याची शक्‍यता आहे. तर जिल्‍हा परिषदेप्रमाणेच राष्‍ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रित येवून चेअरमन, व्‍हा. चेअरमन पदावर दावा करू शकतात. महायुती एकत्र यायचा विषय झाला तरी आधी चेअरमन कोण? त्‍याची टर्म किती? यावरून बरेच घमासान होण्‍याची शक्‍यता आहे. शक्‍यतो टर्म ठरली तरी जिल्‍हा बँकेचा चेअरमन एकदा खुर्चीवर बसला की उतरत नाही हा अनुभव आहे. त्‍यामुळे पहिल्‍या चेअरमनपदावेळीच भाजप विरूध्‍द राष्‍ट्रवादी व शिवसेना यांच्‍यात जिल्‍हा परिषदेप्रमाणेच जुंपण्‍याची चिन्‍हे आहेत.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी महायुती म्‍हणूनच लढा असा कानमंत्र दिला होता. पदवीधर निवडणुकीसाठी मुख्‍यमंत्र्यांनी मित्रपक्षांना सीट वाटपात ॲडजेस्‍टमेंटही केली. प्रत्‍यक्षात पदवीधर निवडणुकीत भाजपचे मित्र पक्ष किती प्रामाणिक वागले हे राज्‍याने पाहिले आहे. त्‍यामुळे फडणवीसांच्‍या कोर्टात चेंडू गेला तरी सातारा जिल्‍ह्याचे भाजपचे नेते संख्‍याबळाने जास्‍त असल्‍याने चेअरमनपदावर आग्रही राहण्‍याची शक्‍यता आहे. तर राष्‍ट्रवादी काँग्रेस व नेहमीप्रमाणेच संख्‍याबळ एकत्र करत प्रसंगी निवडणुकीची तयारी करण्‍याची शक्‍यता आहे. संचालक मंडळाच्‍या प्रत्‍यक्ष निवडणुकीत अनेक ठिकाणी झालेले पाडीपाडीचे प्रयत्‍न चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषत: ना. जयकुमार गोरे यांनी मित्र पक्षांसह स्‍वपक्षातील नेत्‍यांच्‍या भूमिकांवरही बोट ठेवले आहे. त्‍यामुळे या निवडणुकीत भाजपमध्‍येही सर्व अलबेल आहे, असे दिसले नाही. चेअरमन निवडीवेळीही भाजपमधील ही गटबाजी चव्‍हाट्यावर येण्‍याची चिन्‍हे आहेत.

भाजपने पहिल्‍यांदाच जिल्‍हा बँकेत ९ जागा आणत वर्चस्‍व प्रस्‍थापित केले आहे. या शिवाय कोरेगाव, फलटण, खंडाळा या सोसायटी मतदारसंघांमध्‍ये भाजपने राष्‍ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे मताधिक्‍क्‍य घटवण्‍यात कमालीचे यश मिळवले आहे. मतांची फोडाफोडी करत या मतदारसंघांमध्‍ये जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील व रामराजे ना. निंबाळकर यांना जेरीस आणले. तर पाटणमध्‍ये सत्‍यजित पाटणकर यांना ताकत देत त्‍यांनी ना. शंभूराज देसाई यांच्‍याशी थेट पंगा घेतला. त्‍याचाच परिणाम सर्वसाधारण मतदार गटात दिसून आला. जयकुमार गोरे यांचे समर्थक अर्जुन काळे यांना पाडण्‍याचे प्रयत्‍न झाले. या प्रयत्‍नामागे राष्‍ट्रवादी व शिवसेनेतील नेतेमंडळी असल्‍याचा गोरे यांचा आरोप आहे. प्रत्‍यक्ष निवडणुकीत गोरे सावध असल्‍याने काळे यांचा पराभव झाला नाही. निवडणुकीनंतर मात्र ना. गोरे यांनी विरोधकांवर याबाबत थेट आरोप केला आहे. जिल्‍हा बँकेच्‍या चेअरमन निवडीवेळी या घटना डोक्‍यात ठेवून खेळ्या केल्‍या जाणार हे निश्‍चित आहे.

जिल्‍हा बँकेच्‍या निर्णय प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका कायमच निर्णायक ठरत आली आहे. मुख्‍यमंत्र्यांच्‍या शब्‍दाखातर त्‍यांनी मतदारसंख्‍या जास्‍त असूनही संचालक पदाच्‍या जागा कमी घेतल्‍या. आता चेअरमन पदाच्‍या निवडीवेळी ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपमधून स्‍वत: ना. जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, दुसर्‍यांदा संचालक झालेले ज्ञानदेव रांजणे यांची नावे पुढे येवू शकतात. राष्‍ट्रवादीतून स्‍वत: मकरंद पाटील, उदयसिंह उंडाळकर पाटील सुनील माने यांची नावे येवू शकतात. तर शिवसेनेतून शंभूराज देसाई व संजीवराजे ना. निंबाळकर हे दावेदार होवू शकतात.

सद्य स्‍थितीत अनेक मतदारसंघांमध्‍ये झालेली पाडापाडी, जिल्‍हा परिषदेच्‍यावेळी निवडणुकीवेळी घडलेले रामायण, महायुतीतील घटकपक्षांमध्‍ये असलेला अविश्‍वास यामुळे जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या चेअरमनपदाच्‍या निवडीवेळी असंतोष उफाळण्‍याची चिन्‍हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.