Satara District Bank : जिल्‍हा बँकेत ९ जागा बिनविरोध; १२ जागांवर लढती

पाटण, फलटण, जावली, माण, खंडाळा, महाबळेश्‍वरात घमासान; दिग्गजांची माघार
Satara District Bank
Satara District Bank
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा, सहकारातील वर्चस्व आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन सत्ताधारी व विरोधकांनी आपापली रणनीती आखली होती. या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील ११ जागा स्‍वबळावर लढण्‍याचा निर्णय आधी झाल्‍यानंतर उरलेल्‍या १० जागांचे भाजप, राष्‍ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांनी एकमेकांत वाटप केले.

या वाटाघाटींमध्‍ये भाजपला ५, राष्‍ट्रवादीला ३ तर शिवसेनाला २ जागा मिळाल्‍या. आतापर्यंत भोपळ्यावर असलेल्‍या शिवसेनेला एका जागेवर बिनविरोधची संधी मिळाली. तर भाजपला ५ व राष्‍ट्रवादीला ३ जागांवर आपले उमेदवार बिनविरोध निवडून देण्‍यात यश आले. या निवडणुकीत २१ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १२ जागांसाठी लढती रंगणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांनी समन्वय साधत अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. भाजपचे नेते ना. शिवेंद्रराजे भोसले आणि ना. जयकुमार गोरे यांनी राजकीय ताकद पणाला लावली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील तर शिवसेनेचे नेते ना. शंभूराज देसाई, आ. रामराजे नाईक निंबाळकर या नेत्यांनीही आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे या निवडणुकीत केवळ उमेदवारांमधील लढत न राहता, राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेचीही कसोटी लागली आहे. या निवडणुकीमध्‍ये जावली, कराड, कोरेगाव, महाबळेश्‍वर, पाटण, फलटण, खंडाळा, माण या आठ सोसायटी मतदारसंघांमध्‍ये 'हायहोल्‍टेज ड्रामा' पहायला मिळणार आहे.

जावली सोसायटीमधून मागील निवडणुकीत राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्‍यक्ष शशिकांत शिंदे यांना एका मताने पराभवाचा धक्‍का बसला होता. या निवडणुकीत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेवून आपले निकटवर्तीय विठ्ठल गोळे यांना पुढे चाल दिली आहे. आता या निवडणुकीत गोळे यांच्‍या माध्‍यमातून ज्ञानदेव रांजणे यांना शह देण्‍याची तयारी शिंदेंनी केली असली तरी रांजणे यांच्‍याकडे संख्‍याबळ जास्‍त असल्‍याने व त्‍यांना शिवेंद्रराजेंची ताकद असल्‍याने शशिकांत शिंदे यांच्‍या प्रतिष्‍ठेचे काय होणार? याची चर्चा सुरु आहे. कराड सोसायटीमध्‍ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माघार घेतली मात्र धनंजय पाटील यांची मनधरणी करण्‍यात महायुतीला अपयश आले. त्‍यामुळे उदयसिंह पाटील यांना संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

कोरेगावमध्‍ये गेल्‍या निवडणुकीत चिठ्ठीवर जिंकलेल्‍या सुनिल खत्री यांच्‍याविरोधात राष्‍ट्रवादीचे सुनिल माने लढण्‍यासाठी सज्‍ज झाले आहेत. महाबळेश्‍वर सोसायटीमधून राजेंद्र राजपुरे यांना बाजूला जावे लागले असले तरी त्‍यांच्‍या पत्‍नी रुपाली राजपुरे या मैदानात असून शिवसेनेच्‍या संजय मोरे यांच्‍याशी त्‍यांची लढत होणार आहे. खंडाळा सोसायटीत ना. मकरंद पाटील यांनी उभ्‍या केलेल्‍या संतोष साळुंखे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. राष्‍ट्रवादीने अजय भोसले यांना तर भाजपने अनिरुद्ध गाढवे यांना उमेदवारी दिली. राष्‍ट्रवादीतून शामराव गाढवे यांनी बंडखोरी केल्‍याने खंडाळ्यात तिरंगी लढत होणार आहे. माण सोसायटीमध्‍ये पुन्‍हा एकदा गोरे बंधुंमध्‍ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. येथे ना. जयकुमार गोरे, शेखर गोरे, मनोज पोळ अशी भाजप, शिवसेना व राष्‍ट्रवादी अशी जोरदार तिरंगी लढत होणार आहे.

पाटण सोसायटीमध्‍ये ना. शंभूराज देसाई विरोधात सत्‍यजित पाटणकर ही पारंपरिक लढत गाजणार आहे. विधानसभेच्‍या निवडणुकीनंतर हे दोन्‍ही नेते पुन्‍हा एकदा आमने-सामने आले असून सहकार क्षेत्रावर कुणाची पकड हे सिध्‍द करण्‍यासाठी या दोन्‍ही नेत्‍यांना झुंजावे लागणार आहे. फलटण सोसायटी मतदारसंघामध्‍ये रामराजे गट व रणजितसिंह गट यांच्‍यामध्‍ये समन्‍वय साधण्‍यात नेत्‍यांना यश आले नाही. रामराजे ना. निंबाळकर यांनी बंधू संजीवराजे ना. निंबाळकर यांना पुढे चाल दिली असून या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांचे बंधू नगराध्‍यक्ष समशेरसिंह ना. निंबाळकर यांनी शड्डू ठोकला आहे. या निवडणुकीच्‍या निमित्ताने दोन्‍ही निंबाळकरांमधील राजकीय वैर उफाळून आले आहे.

दरम्यान, अर्ज माघारीच्या प्रक्रियेत झालेल्या घडामोडींमुळे काहींना दिलासा मिळाला, तर काहींना थेट निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. बिनविरोध निवडीमुळे भाजपला काही ठिकाणी आघाडी मिळाल्याचे चित्र असले, तरी उर्वरित जागांवरील निकालच जिल्हा बँकेतील सत्तेचे अंतिम गणित स्पष्ट करणार आहेत.

हे नऊ जण बिनविरोध...

या निवडणुकीत ना. मकरंद पाटील (खरेदी विक्री संघ), आ. डॉ. अतुल भोसले (कृषी प्रक्रिया), सोमनाथ उर्फ काका धुमाळ (गृहनिर्माण व दूग्‍ध), रणजितसिंह ना. निंबाळकर (नागरी बँका व पतसंस्‍था), सर्जेराव सावंत (सातारा सोसायटी), नंदकुमार मोरे (खटाव सोसायटी), सत्‍यजीत वीर (वाई सोसायटी), ऋतुजा पाटील आणि मंगल पाटील महिला मतदार संघ हे ९ जण बिनविरोध झाले आहेत.

अशा होणार लढती

पाटण सोसायटी : ना. शंभूराज देसाई विरुद्ध सत्‍यजित पाटणकर

माण सोसायटी : ना. जयकुमार गोरे, शेखर गोरे, मनोज पोळ

जावली सोसायटी : ज्ञानदेव रांजणे विरुध्‍द विठ्ठल गोळे

फलटण सोसायटी : संजीवराजे ना. निंबाळकर विरुध्‍द समशेरसिंह ना. निंबाळकर

महाबळेश्‍वर सोसायटी : रुपाली राजपुरे विरुध्‍द संजय मोरे

कराड सोसायटी : उदयसिंह पाटील विरुध्‍द धनंजय पाटील

कोरेगाव : सुनिल खत्री विरुध्‍द सुनिल माने

खंडाळा सोसायटी : अनिरुद्ध गाढवे, अजय भोसले, शामराव गाढवे

अनुसूचित जाती : माजी आमदार दीपक चव्‍हाण, रवींद्र बडेकर, सुरेश गायकवाड, सत्‍यवान कांबळे.

इतर मागास : योगेश फडतरे विरुध्‍द संदीप पाचांगणे

भटक्‍या जमाती : अर्जुन काळे विरुध्‍द सुनिल वाघ

औद्योगिक विणकर : चंद्रकांत जाधव विरुध्‍द सुनिल वाघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news