

सातारा : जिल्हा बँकेच्या २०२६-३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (दि. २५) सप्टेंबरपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत विविध मतदारसंघांतून ६ उमेदवारांनी एकूण सात नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केली. यामध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जि. प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
२६ व २७ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दोन दिवशी नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृतीचे कामकाज बंद राहणार आहे. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत.
निवडणूक कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे. इतर समर्थक अथवा सोबत्यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.