

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकाराच्या राजकारणाबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकांचीही रंगीत तालीम पाहायला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्षांनी बहुतांश मतदारसंघांत मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी आठ सोसायटी मतदारसंघांत मात्र स्थानिक राजकीय समीकरणांमुळे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यातील पारंपरिक संघर्ष, माणमध्ये मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे व मनोज पोळ यांच्यातील लढत, तर फलटणमध्ये दोन निंबाळकर घराण्यांतील राजकीय वर्चस्वाची परीक्षा रंगणार आहे. कराड, कोरेगाव आणि खंडाळ्यातील लढतींमधूनही आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित न राहता नेत्यांच्या ताकदीची चाचणी ठरत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार की घटक पक्ष स्वतंत्रपणे आपापली ताकद आजमावणार, याचे चित्र आताच स्पष्ट झालेले नाही. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर होणाऱ्या लढती, नेत्यांनी दिलेला पाठिंबा, उमेदवारांची निवड आणि मतविभाजनाची शक्यता यांतून राजकीय पक्षांची ताकद जोखली जाणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील कामगिरीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणता गट सरस ठरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाबळेश्वरमध्ये रूपाली राजपुरेंची कसोटी
महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रूपाली राजपुरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय मोरे यांनी आव्हान उभे केले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील स्थानिक राजकीय समीकरणे आणि सहकारी संस्थांमधील पाठिंबा यावर या लढतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेता रूपाली राजपुरे यांची बाजू तुलनेने मजबूत मानली जात असली, तरी संजय मोरे यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोरेगावमध्ये माने-खत्री पुन्हा आमनेसामने
कोरेगाव सोसायटी मतदारसंघात सुनील माने आणि विद्यमान संचालक सुनील खत्री यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. मागील निवडणुकीत दोघांना समान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीद्वारे खत्री यांचा विजय निश्चित झाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे. यावेळी सुनील माने यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे बळ मिळत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, सुनील खत्री यांच्या पाठीशी भाजपची ताकद उभी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही लढत केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्थानिक प्रभावाचीही परीक्षा ठरणार आहे.