Satara District Bank Election : राष्ट्रवादी-सेनेकडून हिशेब चुकता

भाजप सत्तेबाहेर : जिल्‍हा बँक अध्‍यक्षपदी उदयसिंह पाटील; दीपक चव्हाण उपाध्‍यक्ष
Satara District Bank Election
Satara District Bank Election
Published on: 
Updated on: 

सातारा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्‍या सातारा जिल्‍हा बँकेच्‍या अध्‍यक्ष - उपाध्‍यक्षपदाच्‍या निवडीत राष्‍ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवत जिल्‍हा परिषद निवडणुकीतील जखमांचा हिशेब चुकता केला. बँकेच्‍या अध्‍यक्षपदी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह विलासराव पाटील-उंडाळकर यांची तर उपाध्‍यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्‍हाण यांची बिनविरोध निवड झाली. मुख्‍यमंत्र्यांकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्‍यामार्फत आलेला निरोपही राष्‍ट्रवादी-शिवसेनेच्‍या नेत्‍यांनी धुडकावल्‍याचे समोर आले आहे.

निवडणुकीत २१ पैकी भाजपचे ९, राष्ट्रवादीचे ८ आणि शिवसेनेचे ४ संचालक निवडून आले होते. बँकेत महायुती म्‍हणून भाजप - राष्‍ट्रवादी - शिवसेना यांनी एकत्रितपणे लढण्‍याचा निर्णय घेतला त्‍यातून काही जागा बिनविरोध झाल्‍या तर काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्‍या. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप मोठा पक्ष ठरला. त्यामुळे अध्यक्षपदावर भाजपचा दावा होता. मात्र, या निवडीवेळी महायुतीमधील मतभेद उफाळून आले. भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे यांच्‍यातच बिनसले. तर या उलट शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई व राष्‍ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्‍या साथीने वज्रमूठ घट्ट केली.

जिल्‍हा परिषदेच्‍या पदाधिकारी निवडीवेळी भाजपकडून झालेल्‍या जखमांची राष्‍ट्रवादी - शिवसेनेच्‍या नेत्‍यांना तीव्रतेने जाणीव झाली. १२ संचालकांना एकत्र ठेवत ना. पाटील, ना. देसाई, आ. रामराजे ना. निंबाळकर, खा. नितीन पाटील यांनी रणनीती निश्‍चित केली. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्या उपस्थितीत निवडी झाल्या.

तत्पूर्वी राष्ट्रवादी - शिवसेनेच्या संचालकांची ना. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी ना. पाटील, खा. पाटील, ना. देसाई, उदयसिंह पाटील-संजीवराजे नाईक-निंबाळकर, दीपक चव्हाण, बाळासाहेब सोळसकर यांच्यासह दोन्ही पक्षांचे संचालक उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला. याबाबत महायुती म्‍हणून नव्‍हे तर राष्‍ट्रवादी - सेना म्‍हणूनच त्‍यांची रणनीती ठरली. त्यानंतर ना. पाटील आणि ना. देसाई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व शिवसेनेचे १२ संचालक बँकेत दाखल झाले.

राष्ट्रवादीच्या वतीने उदयसिंह पाटील यांनी अध्यक्षपदासाठी, तर शिवसेनेच्या वतीने दीपक चव्हाण यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. याचवेळी ना. शिवेंद्रराजे यांच्‍या गटाचे संचालक चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव रांजणे आणि सर्जेराव सावंत हे बँकेत दाखल झाले. काही वेळाने मंत्री गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अर्जुन काळे आणि नंदकुमार मोरे हेही आले. पाठोपाठ खा. उदयनराजे भोसले यांचे समर्थक काका धुमाळ हेही दाखल झाले. मात्र उदयसिंह पाटील व दीपक चव्हाण यांचेच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पुढाकारामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगितले. ना. देसाई, ना. पाटील, ना. गोरे, आ. डॉ. अतुल भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या सहकार्यामुळे निवड झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी शिवेंद्रराजेंशी चर्चा करून अध्‍यक्षपदासाठी भाजपच्‍या उमेदवाराचे नाव दिले होते. शिवेंद्रराजेंनी हा निरोप ना. पाटील यांच्‍याकडे दिला. मात्र आमचं आता ठरलंय असे सांगून ना. पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांचा निरोप धुडकावला.

काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात; पण ज्या खोलवर असतात, त्या लवकर बऱ्या होत नाहीत. त्या बऱ्या होण्यासाठी थोडा उशीर लागतो आणि जालीम औषध घ्यावे लागते.
- ना. शंभूराज देसाई, पालकमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.