Satara District Bank Election : माणमध्ये हायव्‍होल्टेज तिरंगी सामना

ना. जयकुमार गोरे, शेखर गोरे व मनोज पोळ झुंजणार
Satara District Bank Election : माणमध्ये हायव्‍होल्टेज तिरंगी सामना
Published on: 
Updated on: 
राजेश इनामदार

दहिवडी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असताना, सोसायटी मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विद्यमान संचालक शेखर गोरे आणि स्व. सदाशिवराव पोळ यांचे चिरंजीव मनोज पोळ या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने माणमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीसाठी एकीचे प्रयत्न होत असताना माणमध्ये मात्र तिन्ही मातब्बर आमनेसामने आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी ठरावांची प्रक्रिया सुरू असतानाच माण तालुक्यातील राजकीय संघर्षाची ठिणगी पडली होती. तिन्ही नेत्यांनी आपापल्या बाजूने ठराव वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. ना. जयकुमार गोरे यांनी सुरुवातीपासून नियोजनबद्ध पद्धतीने ठराव मिळवण्यावर भर दिला. विद्यमान संचालक शेखर गोरे यांनीही अनेक ठराव आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज पोळ यांनीही पक्षाच्या माध्यमातून मतदारसंघात आपली ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला.

ना. जयकुमार गोरे यांच्याविरोधात शेखर गोरे किंवा मनोज पोळ यांच्यापैकी एकच उमेदवार मैदानात राहील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. दोघांपैकी एकाने माघार घेतल्यास दुरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही माघार न घेतल्याने सर्व राजकीय अंदाज फोल ठरले आणि तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाले.

माण तालुक्यातील या तिरंगी लढतीमागे राजकीय प्रतिष्ठा, वैयक्तिक समीकरणे आणि रणनीती यांची चर्चा सुरू झाली आहे. ना. जयकुमार गोरे यांच्याकडे तुलनेने अधिक ठराव असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांच्यासमोर विरोधकांची मते विभागली जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरीकडे, शेखर गोरे आणि मनोज पोळ यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने मतांचे गणित नेमके कसे बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही विरोधी उमेदवार एकत्र येऊन एकच उमेदवार देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. तिघांमध्ये माघारीसंदर्भात चर्चा झाली होती का, संपर्काचे प्रयत्न झाले होते का आणि अखेर स्वतंत्र लढतीचा निर्णय कसा झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय प्रतिष्ठेची लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माण तालुका नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. यंदा तीन प्रमुख नेत्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. ठरावांच्या राजकारणातून सुरू झालेली रस्सीखेच आता प्रत्यक्ष मतदानाच्या मैदानात पोहोचली आहे. ना. जयकुमार गोरे आपले वर्चस्व कायम राखणार, शेखर गोरे राजकीय समीकरणांना धक्का देणार की मनोज पोळ अनपेक्षित बाजी मारणार? माणच्या या तिरंगी लढतीत अखेर कोण विजयी ठरणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news