

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार व्यूहरचना आखली असून, पक्षाच्या मुशीत तयार झालेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत अनेक मतदार संघांत उमेदवारीवरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मतदारसंघांतील हालचालींमुळे महायुतीतील अंतर्गत कल्लोळ चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेत भाजप आक्रमक असताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मात्र बेसावध आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मोजक्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीपेक्षा त्यांनी निवडणुकीच्या राजकारणाबाबत केलेले भाष्य अधिक चर्चेत आले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणूक यंदा सहकाराच्या चौकटीत होणार की महायुतीतील अंतर्गत राजकारणाची रंगतदार लढत ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 'राजकारण बँकेच्या बाहेर ठेवा या उदयनराजेंच्या भूमिकेमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर सुरू असलेल्या चर्चेला आणखी धार आली आहे. विशेष म्हणजे, मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
गेल्या निवडणुकीत सर्वपक्षीयांनी एकत्र येवून निवडणूक लढवली. त्यानंतर मात्र चेअरमनपदावेळी पक्षीय भूमिका घेतली गेली. त्यामुळे भाजपनेते शिवेंद्रराजे भोसले नाराज राहिले आहेत. आताही तसेच होणार नाही कशावरुन? असा प्रश्न करत ते सावध भूमिकेत आहेत. दुसरीकडे जयकुमार गोेरे हे तर भाजपने स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जावे यावर ठाम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे बोलले जात असले तरी जयकुमार गोेरे यांची जिल्हा परिषदेप्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही कमळ फुलवण्याची महत्वकांक्षा आहे. आधी भाजपचा निर्णय होईल आणि नंतरच गरज भासल्यास मित्रपक्षांशी चर्चा करु हे गोरे यांचे विधान लक्षवेधक आहे. दुसरीकडे शिवेंद्रराजे यांनी अद्यापही कुणाशी चर्चा झाली नसून सर्व नेते एकत्र येवून निर्णय घेतील असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील महायुती व्हावी यासाठी उत्सुक आहेत. उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मकरंदआबा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस सुखावली आहे. शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई आजवर जिल्हा बँकेपासून दूर राहिले आहेत. त्यांचीही बँकेत जाण्याची इच्छा आहे. महायुती व्हावी, असे ते यापूर्वीही बोलले आहेत. मात्र त्याचवेळी ज्येष्ठ संचालक आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली आहे. गोरे, निंबाळकर वगळून शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखालील महायुती असा रामराजेंचा फार्म्यूला दिसतो. मात्र त्याला कितपत मान्यता दिली जाईल यावर उलट सुलट चर्चा सुरु आहे.
उदयनराजेंची भूमिका मकरंदआबा, रामराजे ना. निंबाळकर, शंभूराज देसाई यांच्यासाठी पूरक आहे. मात्र, त्याचवेळी शिवेंद्रराजे भोसले हे सावध असल्याने व त्यांनी या प्रक्रियेत वेट ॲण्ड वॉच असे धोरण ठेवल्याने या नेत्यांनाही कोणताही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे महायुतीतच कल्लोळ माजला आहे. महाविकास आघाडी या प्रक्रियेत अद्याप कुठेच नाही. महायुतीतच फोडाफोडी झाल्यास पक्षविरहीतच्या नावाखाली महाविकास आघाडीचे इच्छुक नेते कोणत्यातरी पॅनलचा सहारा घेतील. एकमात्र निश्चित महायुती जरी झाली तरी सोसायटी मतदार संघात घनघोर लढाया होतील. कारण फलटणमध्ये रामराजे ना. निंबाळकर व रणजितसिंह ना. निंबाळकर, पाटणमध्ये शंभूराज देसाई व सत्यजितसिंह पाटणकर, वाईमध्ये मकरंदआबा पाटील व मदनदादा भोसले हे कधीही एकत्र येवू शकत नाहीत. महायुतीतच सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पॅनल पडणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.