

सातारा : जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, बेईमानी आमच्या रक्तात नाही. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीत काही ठिकाणी महायुती धर्म पाळला गेला नाही, असा आरोप ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार जिल्हा बँकेची निवडणूक झाली. ज्या जागा वाट्याला आल्या त्या पद्धतीने निवडणूक झाली असली तरीही दगाफटका झालेला आहे. अर्जुन काळे यांनी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीपासून सहकारी म्हणून काम केले आहे. जिल्हा परिषदेत, पंचायत समितीतही आम्ही संयुक्तपणे काम केले. मात्र, त्यांच्या मतदारसंघातील तालुकानिहाय आकडेवारी वेगळे सांगत आहे. फलटणमधील सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या लढाईला सॅल्यूट करतो.
भाजपाची २९ मते असताना आमच्या शिलेदारांनी ही लढत टोकावर आणून ठेवली. अवघ्या पाच मतांनी निसटता पराभव झाला. कराड तालुक्यात डॉ. अतुल भोसले व त्यांच्या टीमने मदत केली असल्याने काळे यांना २०२ मते मिळाली. महायुतीत अर्जुन काळे यांना पराभूत करण्याचा मोठा डाव होता. दगाफटका करण्याची तयारी होती. तरीही काळे यांनी एकाकी लढत देऊन निवडणूक जिंकली. भाजपने स्वबळावर जिल्हा बँकेची स्वबळावर निवडणूक लढली असती तर जिंकलो असतो. काही गोष्टी अनुभवातून शिकता येतात. या निवडणुकीत मला खूप काही शिकायला मिळाले, अशा शब्दांत त्यांनी महायुतीसह भाजपमधील सहकाऱ्यांबद्दलही नाराजी व्यक्त केली.
बँकेच्या निवडणुकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला का? असे विचारले असता ना. गोरे म्हणाले, मी अहवाल द्यायची गरज नाही. मुख्यमंत्र्यांकडे माहिती देणारी यंत्रणा असते. माझी कोणाविरुद्ध तक्रार नाही. मला कोणाबद्दल राग किंवा असूया नाही. ना. गोरे यांना जिल्हा बँकेत पाय ठेवू देणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, मी तर पाय ठेवलाच आहे, पण माझ्यासोबत माझे अनेक शिलेदार घेऊन ठेवलाय. मी बँकेत फॉर्म भरायला गेलो नाही आणि थेट बँकेत संचालक म्हणून गेलो आहे. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून बँक चालली पाहिजे. ‘जो दे उसका भला, जो न दे उसका ही भला’, असेही ना. गोरे म्हणाले.
बँकेचा अध्यक्ष कोण होणार यावर ना. गोरे म्हणाले, अध्यक्ष कोणाचा होईल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार आणि सर्व नेते मिळून योग्य निर्णय घेतील. यावेळी जिल्हा बँक संचालक अर्जुन काळे, नंदकुमार मोरे, जि. प. सदस्य दिलीप बाबर, माजी जि. प. सदस्य अरुण गोरे व पदाधिकारी उपस्थित होते.