Satara DCC Bank Election : माणमध्ये जिल्हा बँक निवडणुकीची रंगत

५० पैकी ३६ ठराव जयकुमार गोरे समर्थकांच्या बाजूने
Satara DCC Bank Election
माणमध्ये जिल्हा बँक निवडणुकीची रंगत
Published on
Updated on

राजेश इनामदार

दहिवडी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील ठरावाच्या प्रक्रियेला वेग व राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्यातील एकूण ७७ सोसायट्यांपैकी आतापर्यंत ५० सोसायट्यांमध्ये ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित २८ सोसायट्यांमध्ये ठराव होणे बाकी आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पूर्ण झालेल्या ठरावांपैकी ३६ ठराव भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या समर्थकांच्या बाजूने झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघात मंत्री गोरे यांची पकड मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे. मंत्री जयकुमार गोरे हे स्वतः संचालक पदाची निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, त्यांच्या विजयासाठी समर्थकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने ११ ठराव झाल्याची चर्चा असून, विद्यमान संचालक शेखर गोरे यांच्या समर्थकांच्या बाजूने तीन ठराव झाल्याचेही तालुक्यात बोलले जात आहे. दरम्यान, विविध इच्छुक उमेदवारांच्या नावांनाही ठरावांमधून बळ मिळत आहे. ना. जयकुमार गोरे यांचा बोडके आणि आंधळी येथून ठराव झाला आहे. विद्यमान संचालक शेखर गोरे यांचा महिमानगड सोसायटीतून ठराव मंजूर झाला आहे. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा महाबळेश्वरवाडी सोसायटीतून ठराव झाला असून, स्व. सदाशिवराव पोळ यांचे चिरंजीव मनोज पोळ यांचा खरेदी-विक्री संघासह भालवडी सोसायटीतून ठराव झाला आहे. तसेच माजी सभापती श्रीराम पाटील यांचा वाकी वरकुटे येथून ठराव करण्यात आला आहे.

गेल्या दोन जिल्हा बँक निवडणुकांमध्ये माण तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले होते. निवडणुकीनंतर दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणांचे पडसाद आजही काही कार्यकर्त्यांना भोगावे लागत आहेत. मात्र, यावेळी ठराव प्रक्रिया खूपच शांततेत सुरू असल्याचे चित्र आहे. भाजपकडून मंत्री जयकुमार गोरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. आठवड्यातून एकदा माणमध्ये येऊन सुद्धा गावोगावच्या सोसायटी सदस्यांना भेटण्यासाठी बोलावून ना. गोरे यांनी सोसायटी संचालकांचे म्हणणे जाणून घेतले. तर विरोधक अद्याप ही ठरावाबाबत चाचपडताना दिसत आहेत. ना. गोरे यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. विद्यमान संचालक शेखर गोरे यांनी सध्या संयमाची भूमिका घेतल्याचे दिसत असले, तरी ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. उर्वरित २८ सोसायट्यांचे ठराव आणि त्यानंतरचे राजकीय समीकरण यावरच माण तालुक्यातील जिल्हा बँक निवडणुकीचे पुढील चित्र अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news