Satara District Bank Election : जिल्हा बँकेच्या मतदानात छुप्या कॅमेऱ्यांचा वापर होण्याची भीती

कॅमेरा पेन, चष्मे, बटनांवर बंदी घालण्याची मागणी : संवेदनशील केंद्रांवर जमावबंदी लागू करा
Elections
Elections
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय रसद खर्च करूनही उमेदवारांमध्ये परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांकडून दगाफटका होऊ नये आणि त्यांनी कोणाला मतदान केले, याची खात्री करता यावी, यासाठी छुपे कॅमेरे असलेल्या पेन, चष्मे, घड्याळे आणि शर्टाच्या बटनांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा संशयास्पद वस्तूंवर मतदान केंद्रांवर बंदी घालावी, तसेच संवेदनशील मतदान केंद्रे आणि शहरांमध्ये जमावबंदी लागू करावी, अशी मागणी काही उमेदवारांनी प्रशासनाकडे केली आहे.

जिल्हा बँकेची ही निवडणूक आजी-माजी मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मतदानाचा अधिकार असलेल्या ठरावधारकांना आपल्याकडे ठेवण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उमेदवारांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. अनेक मतदारांना सहली आणि देवदर्शनाच्या निमित्ताने राज्याबाहेर नेण्यात आले असून, त्यांच्यावर विविध निर्बंध घातल्याच्या तक्रारीही आहेत. काही ठिकाणी मतदारांचे मोबाईल काढून घेतल्याचे, त्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधता येत नसल्याचेही आरोप होत आहेत.

सेवा सोसायट्यांच्या ठराव प्रक्रियेपासूनच जिल्ह्यात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली होती. ग्रामीण भागातही या निवडणुकीच्या निमित्ताने मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. मतदारांना आपल्याच बाजूने ठेवण्यासाठी काही उमेदवारांनी खासगी सुरक्षा व्यवस्था, बॉडीगार्ड, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज तैनात केल्याची चर्चा आहे. मतांच्या बदल्यात आर्थिक आणि राजकीय तडजोडी झाल्याच्या आरोपांमुळे निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे.

मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवारांमध्ये मात्र मतदारांच्या निष्ठेबाबत साशंकता असल्याचे चित्र आहे. मतदान केंद्रात मोबाईल वापरास परवानगी नसल्याने छुपे कॅमेरे असलेल्या पेन, चष्मे, घड्याळे किंवा शर्टाच्या बटनांचा वापर करुन मतदानाची छायाचित्रे टिपली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदान करून बाहेर आल्यानंतर संबंधित मतदाराची उलटतपासणी करण्यासाठी अशा उपकरणांचा वापर होऊ शकतो, अशी भीती काही उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय मतदानाच्या दिवशी काही संवेदनशील केंद्रांवर गोंधळ किंवा राडा घालून मतदारांवर दबाव आणण्याचे प्रकार घडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा उपकरणांच्या वापरावर प्रतिबंध घालावा, मतदान केंद्रांवर कडक तपासणी करावी आणि संवेदनशील ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवडणुकीतील राजकीय प्रतिष्ठा, आर्थिक उलाढाली आणि मतदारांभोवती निर्माण झालेले संशयाचे वातावरण पाहता प्रशासन कोणती खबरदारी घेणार, याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.