Satara District Bank Election : भाजप ९, राष्‍ट्रवादी ८ तर शिवसेनेला ४ जागा

जिल्हा बँकेवर प्रथमच भाजपचे प्राबल्य : ना. जयकुमार गोरे, ना. शंभूराज देसाई यांची दिमाखात एंट्री
Satara District Bank Election : भाजप ९, राष्‍ट्रवादी ८ तर शिवसेनेला ४ जागा
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात संचालक मंडळाच्या २१ पैकी भाजपने सर्वाधिक ९ जागा जिंकल्‍या आहेत. बँकेच्या स्थापनेपासूनच प्रथमच बँकेवर कमळ फुलत भाजपने प्राबल्य निर्माण केले आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ८, तर शिवसेनेने ४ जागा पटकावल्या आहेत. सोसायटी मतदारसंघातील ८ जागांवर तर उर्वरित ४ जागांवर लढती होऊन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मातब्बरांनी जिल्हा बँकेत एंट्री केली.

बँकेच्या २१ जागांपैकी ९ जागा महायुतीच्या माध्यमातून यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १२ जागांसाठी रविवारी जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. २,०२१ मतदारांपैकी १,९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी जरंडेश्वर नाका येथील नागरी बँक असोसिएशनच्या केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

फलटण सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे संजीवराजे ना. निंबाळकर आणि भाजपचे समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. संजीवराजे यांना ७१, तर समशेरसिंह यांना ६० मते मिळाली. ११ मतांनी विजय मिळवत संजीवराजे यांनी फलटणमधील ताकद दाखवून दिली. खंडाळा सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर शामराव गाढवे यांनी ऐनवेळी अजय भोसले यांना पाठिंबा दिल्याने भाजपचे संजीव गाढवे विरुद्ध राष्ट्रवादीचे अजय भोसले अशी लढत रंगली. मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीचा गड ढासळला नाही. अजय भोसले यांना २८, तर संजीव गाढवे यांना २१ मते मिळाली. सात मतांनी अजय भोसले विजयी झाले.

जावली सोसायटी मतदारसंघात भाजपचे ज्ञानदेव रांजणे विरुद्ध शशिकांत शिंदेंचे समर्थक विठ्ठल गोळे अशी लढत झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मागील निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभूत झालेले शशिकांत शिंदे यांनी ऐनवेळी माघार घेत गोळे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. ज्ञानदेव रांजणे यांना ३८, तर गोळे यांना अवघी आठ मते मिळाली. यामुळे ३० मतांच्या फरकाने रांजणे यांनी विजय मिळवला. महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रूपाली राजपुरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे अशी लढत झाली. तीन टर्म संचालक राहिलेल्‍या राजेंद्र राजपुरे यांना आरबीआयच्या १० वर्षांच्या नियमामुळे संचालकपद सोडावे लागले होते. मात्र, मतदारसंघावरील राजपुरे कुटुंबाची पकड कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले. रूपाली राजपुरे यांना आठ, तर संजय मोरे यांना चार मते मिळाली. चार मतांनी रूपाली राजपुरे विजयी झाल्या.

कोरेगाव सोसायटी मतदारसंघात भाजपचे सुनील खत्री आणि राष्ट्रवादीचे सुनील माने यांच्यात काट्याची टक्कर झाली. सुनील खत्री यांना ४४, तर सुनील माने यांना ४५ मते मिळाली. मात्र, सुनील माने यांच्या एका मताची चिठ्ठी फाटकी असल्याचा आक्षेप खत्री यांनी घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप मान्य केल्यानंतर ईश्वरचिठ्ठी काढली. या चिठ्ठीने सुनील माने यांना कौल दिला आणि कोरेगावचा निकाल नाट्यमयरीत्या राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. कराड सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील यांना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी साथ दिली होती. उदयसिंह पाटील यांना १००, तर प्रतिस्पर्धी धनंजय पाटील यांना ४४ मते मिळाली. ५६ मतांच्या फरकाने उदयसिंह पाटील यांनी विजय मिळवला.

माण सोसायटी मतदारसंघात मंत्री गोरे यांच्या प्रतिष्ठेची लढत होती. शिवसेनेचे शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांच्याशी त्यांचा सामना रंगला. या तिरंगी लढतीत गोरे यांनी ५३ मते मिळवत विजयी शड्डू ठोकला. पोळ यांना १४ मते मिळाली. शेखर गोरे यांना ७ मते मिळाली. यामुळे माणमधील ना. गोरेंचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले.

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात माजी आमदार दीपक चव्हाण यांनी १ हजार ७५१ मतांची आघाडी घेत विरोधकांवर मात केली. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीचे योगेश फडतरे यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांना १,८८३ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी संदीप पाचांगणे यांना ८५ मते मिळाली. १,७९८ मतांच्या फरकाने फडतरे विजयी झाले. औद्योगिक विणकर मतदारसंघात ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्तीय आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी २९४ मते मिळवत विजय मिळवला. या मतदारसंघात सुनील वाघ यांनी ऐनवेळी जाधव यांना पाठिंबा दिला होता. तरीही वाघ यांना मिळालेली २४ मते चर्चेचा विषय ठरली आहेत. निवडणुकीचा एक-एक निकाल जस-जसा समजत होता, तसा कार्यकर्त्यांचा उत्‍साह वाढताना दिसत होता. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि हलगीच्या निनादात जल्लोष केला. विजयी मिरवणुकांनी परिसर दणाणून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.