

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर जिल्हाभरातून ४९ आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या आक्षेपांवर २ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे सुनावणी होणार असून, ७ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था डॉ. महेश कदम यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी निश्चित करण्याची ठराव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेत विकास सेवा सोसायट्यांकडून ९६४, नागरी बँका व पतसंस्थांकडून ३८०, खरेदी-विक्री संघातून ११, औद्योगिक व विणकर मतदारसंघातून ३३१, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून २९, तर गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्थांकडून २९७ ठराव प्राप्त झाले. अशा प्रकारे एकूण २ हजार १२ ठराव सहकार विभागाकडे प्राप्त झाले आहेत.
या ठरावांच्या आधारे तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी जिल्हा बँकेसह सहकार विभागाच्या संबंधित कार्यालयांमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीवर १८ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाभरातून ४९ आक्षेप कोल्हापूर विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. या आक्षेपांवर २ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असून, संबंधित तक्रारदार तसेच ज्यांच्याविरोधात आक्षेप दाखल करण्यात आले आहेत, त्यांना सुनावणीच्या नोटिसा पाठवण्यात येत आहेत.
सहकार क्षेत्राचे लागलेय लक्ष...
सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आक्षेपांवरील निर्णय जाहीर केला जाईल. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करुन ११ सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सोसायट्यांचे ठराव करत असताना गावागावांत तणावाचे वातावरण होते. त्यामुळे आक्षेपांवरील सुनावणीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.