

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खलबते केली. जिल्ह्यात महायुतीमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांशी वस्तुस्थिती कथन केली. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री महायुतीतील जिल्ह्यातील सर्वच मंत्री व नेत्यांशी फोनवरून बोलून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय देणार असल्याचे समजते.
बँकेच्या निर्णय प्रक्रियेत शिवेंद्रराजे यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. भाजपने निर्णयाचे सर्व अधिकार त्यांनाच दिले होते. त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत स्वत:च्या गटाला जागा कमी घेतल्या. महायुतीत भाजपला सर्वाधिक ९ जागा, राष्ट्रवादीला ८ तर शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. मात्र, महायुतीत स्वपक्षीयांमधून व घटक पक्षांतूनही एकमेकांचे उमेदवार पाडण्याची प्लॅनिंग्ज झाली. त्यातून भाजप अंतर्गत मतभेदही उफाळून आले तर महायुतीतूनही नेत्यांमध्ये मतभेद झाले आहेत. त्यातूनच विसंगत विधाने बाहेर पडली. महायुतीच्या नेत्यांची एक बैठक झाली. त्याला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित नव्हते.
उदयनराजेंनी पुण्यात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या गटावर अन्याय होत असल्याची भावना मांडली तर दुसरीकडे एका कार्यक्रमात शिवेंद्रराजेंनी ‘जो आपल्याला नडतो त्याला टप्प्यात आल्यावर डोक्यावर टाकतोच’, असे विधान करून खळबळ उडवून दिली. शिवेंद्रराजेंचा रोख बँकेच्या दिशेनेच होता. महायुतीत विसंवाद निर्माण झाला असतानाच बुधवारी बँकेची चेअरमन निवड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची वस्तुस्थिती मांडण्यासाठी शिवेंद्रराजेंनी मुंबईत कॅबिनेट बैठकीनंतर फडणवीस यांची भेट घेतली.
भेटीत बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाबाबत चर्चा झाली. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची भूमिकाही शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. त्याचवेळी जिल्ह्यातील भाजपची भूमिकाही त्यांनी मांडली. भाजपचाच अध्यक्ष व्हावा अशी आपलीही भूमिका असल्याचे शिवेंद्रराजेंनी सांगितल्याचे समजते. मात्र, याबाबत आपण स्वत: महायुतीतील अन्य मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुचवल्याचे समजते. त्यानुसार फडणवीस स्वत: बुधवारी सकाळी चेअरमन निवडीपूर्वी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मंत्री व नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची पुनरावृत्ती बँकेत होता कामा नये यासाठी फडणवीसांनी पुढाकार घेतल्याचे या बैठकीत समजते.
आता शिवेंद्रराजेंच्या या खलबतांनंतर फडणवीस बुधवारी सकाळी कोणता निर्णय घेणार, तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना मान्य होणार का, याविषयी उत्सुकता आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात अतुल भोसले चेअरमन हाेणार की उदयसिंह उंडाळकर याचीच उत्सुकता आहे की ऐनवेळी वेगळे कार्ड बाहेर येणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.