

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीचे गोडवे गायले जात असले, तरी जिल्हा बँकेचा चेअरमन भाजपचा होणार की राष्ट्रवादीचा, यावरून पडद्यामागे बरेच रामायण घडत आहे. संचालकपदांच्या निवडणुकीवेळी झालेली पाडापाडी काही संचालक न विसरल्याने चेअरमन निवडीवेळी महायुतीतील कुरघोड्यांचे महाभारत समोर येणार आहे.
ग्रामविकासमंत्री व भाजपच्या उमेदवारांसाठी संपूर्ण जिल्ह्यात सर्वात जास्त परिश्रम घेणारे नेते जयकुमार गोरे यांना कोणत्याही परिस्थितीत चेअरमन पदावर भाजपचा उमेदवार बसवायचा आहे. त्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाही ते सातारा जिल्ह्यात लक्ष घालायला लावण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडे स्वत: जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, ज्ञानदेव रांजणे, चंद्रकांत जाधव, सर्जेराव सावंत, काका धुमाळ अशी चेअरमनपदाची योग्यता असणारे एकास एक वरचढ उमेदवार आहेत.
गोकुळसारख्या एका जिल्ह्याच्या निवडणुकीसाठी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एवढे लक्ष घातले होते. इथे तर आशिया खंडात लोकप्रिय असणारी व देशात नावाजली गेलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. ज्या बँकेतून कधी काळी देशातले व राज्यातले निर्णय व्हायचे अशा बँकेच्या चेअरमनपदाची संधी आली असताना भाजप ती साेडेल का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाचे तरी याबाबतीत ऐकतील का? देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनासुद्धा ज्या बँकेची भुरळ आहे अशा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन करण्याची संधी आलेली असताना भाजप ती सोडेल का? या सर्व प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे एकत्रित येऊन भाजपचा चेअरमन व्हावा, यासाठी प्रयत्न करताना दिसतील.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलाच चेअरमन होणार म्हणून गुदगुल्या सुरू आहेत. राष्ट्रवादीकडे ८ जागा असल्या, तरी शिवसेनेच्या चार जागाही ते आपल्या साेबत मोजत आहेत. त्याद्वारे आम्ही मिळून १२ असे सांगत त्यांचा भाजपवर दबाव सुरू आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांच्याद्वारे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स अनेक ठिकाणी झळकताना दिसले होते. जयकुमार गोरेंना जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपने स्वबळावर निवडणूक करावी असे वाटत होते; मात्र मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पटवून महायुती म्हणून निवडणूक व्हावी, असा आग्रह धरला. त्याला यशही आले. जागा वाटपात राष्ट्रवादीला ४ जागा ठरल्या असताना ‘पदवीधर’ला भाजपला मदत करतो म्हणून पाचवी जागाही त्यांनी पदरात पाडून घेतली. ‘पदवीधर’ला पाटील बंधूंनी किती मदत केली, याची आकडेवारी मुख्यमंत्र्यांकडे आहे, तरीही शंभूराज देसाई व रामराजे यांना साेबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेससाठीच्या चेअरमनपदाचे मनसुबे पाटलांनी बांधले आहेत.
राष्ट्रवादीतून स्वत: मकरंद पाटील, उदयसिंह पाटील -उंडाळकर, सुनील माने, सत्यजित वीर अशी नावे चर्चेत आहेत; मात्र भाजप व शिवसेनेचे नेते हे उदयसिंह पाटील-उंडाळकर या नावाला विरोध करणार नाहीत, हे लक्षात घेऊन पाटील बंधू उंडाळकरांनाच चेअरमनपदाच्या घोड्यावर बसवतील.
उंडाळकर हे शंभूराज देसाई यांचे साडू आहेत. विलासकाकांचे चिरंजीव असल्याने रामराजेंचा त्यांच्या नावाला विरोध नसणार. मध्यंतरी जयकुमार गोरे व मकरंद पाटील यांचे मिटावे म्हणून बैठक घेतली होती ती उंडाळकरांनीच. त्यामुळे गोरेंचाही उंडाळकरांच्या नावाला विरोध राहणार नाही आणि स्व. विलासकाका उंडाळकर व स्व. अभयसिंहराजे भोसले यांची मैत्री लक्षात घेता शिवेंद्रराजेही उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नावाला होकार देतील असा व्होरा मकरंद पाटील व खा. नितीन पाटील यांचा आहे; पण राजकारणात एकाचवेळी अनेकांना खेळवता येत नाही. वारसा तर दोन्ही पक्षांतील अनेकांकडे आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण चेअरमन निवडीवेळी पाहायला मिळेल. कोल्हापुरात गोकुळचा चेअरमन राष्ट्रवादीचा आहे, तर खंडाळा कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने माघार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार बिनविरोध केले आहेत, हे दाखलेसुद्धा भाजपचे नेते देताना दिसतील.
संचालकांच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने, भाजप आणि शिवसेनेने एकमेकांना पाडण्याचे प्रकार केले. मतमोजणीवेळीही बराच काथ्याकुट झाला. त्यामुळे निवडून आलेले असे संचालक चेअरमनपदाचा उमेदवार आवडला नाही, तर आदेश पाळतीलच असे नाही. चेअरमनपदाचा निर्णय जिल्ह्यातच होईल, अशा अटकळी नेत्यांनी बांधल्या असल्या, तरी तसे घडणार नाही. प्रत्यक्ष मतमोजणीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन येत असेल, तर आशिया खंडातल्या सर्वात लोकप्रिय अशा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअमनपदाचा निर्णय फडणवीसच घेणार, हे निश्चित!