

सातारा : सातारा व पालघर येथील जिल्हा सत्र न्यायाधीशांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यात लाचखोरीच्या आरोपातील धनंजय निकम या सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा यामध्ये समावेश आहे. दि. 1 ऑक्टोबरपासून त्यांना पदमुक्त केल्याचे उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.
सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु दोन्ही न्यायालयांनी त्यांना दिलासा दिला नाही. त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते. याप्रकरणी त्यांची उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे निकम यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आला आहे.
या सोबतच पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख यांच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मुंबईतील बॅलॉर्ड पिअर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना अमली पदार्थ प्रतिबंधक
कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याची प्रकरणे सुनावणीसाठी होती. त्यावेळी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या आणि मुद्देमाल म्हणून न्यायालयात सादर केलेल्या अमली पदार्थांची ते तस्करी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. न्यायाधीशांवर झालेल्या बडतर्फीच्या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.