Satara News : ‘पुढारी’च्या दणक्यामुळे मातीचा ढिगारा हटवला

सातारा पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारालगत साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झाला होता
Satara News : ‘पुढारी’च्या दणक्यामुळे मातीचा ढिगारा हटवला
Published on: 
Updated on: 

कोडोली : सातारा पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारालगत साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित विभागाला जाग आली. प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रवेशद्वाराजवळील मातीचा ढिगारा हटविल्याने नागरिकांसह वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून, दैनिक ‘पुढारी’चे आभार मानले आहेत.

सातारा पंचायत समितीचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयालगत आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या संरक्षक भिंतीलगत खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केलेला भाग मातीने बुजविला. मात्र, उर्वरित माती पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या एका कोपऱ्यालगत टाकून ठेवण्यात आली होती.

या मातीच्या ढिगाऱ्यामुळे प्रवेशद्वाराजवळील रस्ता अरुंद झाला होता. पंचायत समिती कार्यालयात ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनचालकांना वाहनांची ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. त्यातच प्रवेशद्वाराजवळ वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या समस्येकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ने मातीच्या ढिगाऱ्याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची संबंधित विभागाने तातडीने दखल घेत मातीचा ढिगारा हटविला. त्यामुळे पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता मोकळा झाला असून, वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक ‘पुढारी’ने नागरिकांच्या समस्येला वाचा फोडल्याने आणि वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाने कार्यवाही केल्याने परिसरातील नागरिक, पंचायत समितीचे कर्मचारी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news