Makarand Patil | सातारा जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित : ना. मकरंद पाटील

राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले
Makarand Patil
Makarand Patil
Published on: 
Updated on: 

सातारा : राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश झाला असून या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

शासनातर्फे यापूर्वी ट्रिगर-१ लागू झालेल्या २६५ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सातारा, माण, खटाव, महाबळेश्वर, फलटण, खंडाळा या तालुक्यांचा समावेश होता. मात्र वाई, कोरेगाव, जावली, पाटण, कराड यांचा समावेश नव्हता. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा यासाठी पाठपुरावा सुरू होता. मदत व पुनर्वसन विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार ट्रिगर-२ च्या आधारे आणखी ३९ तालुक्यांचा नव्याने समावेश केल्याने एकूण ३०४ तालुके अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.

या नवीन दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये यादीत वाई, कोरेगाव, कराड, पाटण या तालुक्यांचा समावेश केला असून या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये १२ उपाययोजना व सवलती लागू करण्याचा शासन निर्णय झाला असल्याचे ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.

याचा लाभ सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना होणार आहे. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांचा समावेश आहे. जलसंधारणाची कामे सुरू करणे आणि पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, अशा उपाययोजना करण्यात येणार असल्याचे ना. पाटील म्हणाले.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दुष्काळग्रस्त भागातील पाणी, चारा, रोजगार आणि शेतीसंबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.
-ना. मकरंद पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news