Satara News: विजेच्‍या जी‍र्ण खांबामुळे ग्रामस्थांचा जीव मुठीत

महावितरणच्‍या दिरंगाईमुळे संतापाची लाट ; चव्हाणवाडीतील पाच खांब कोसळण्याच्या स्थितीत
Satara News: विजेच्‍या जी‍र्ण खांबामुळे ग्रामस्थांचा जीव मुठीत
Published on
Updated on
तुषार देशमुख

सणबूर : पाटण तालुक्यातील दुर्गम चव्हाणवाडी येथे नागरिकांच्या डोक्यावर अक्षरशः मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. गावातील चार ते पाच विद्युत खांब पूर्णपणे गंजून धोकादायक अवस्थेत उभे असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भरवस्तीत असलेल्या या खांबांमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला असतानाही महावितरण विभागाकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या लोखंडी विद्युत खांबांचा तळाचा भाग पूर्णपणे गंजून निकामी झाला आहे. काही खांब वाकलेल्या अवस्थेत उभे असून त्यांची मजबुती संपुष्टात आली आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे किंवा किरकोळ धक्का बसला तरी हे खांब कोसळू शकतात. दुर्दैवाने हे सर्व खांब घरांच्या, अंगणांच्या आणि नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीच्या ठिकाणी असल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या गंभीर धोक्याची कल्पना देत ग्रामस्थांनी मे महिन्यात महावितरण विभागाकडे लेखी निवेदन देऊन तातडीने नवीन खांब उभारण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप ना प्रत्यक्ष पाहणी झाली, ना दुरुस्तीचे काम सुरू झाले. त्यामुळे दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, राज्याचे पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांच्या मागणीनुसार जीर्ण आणि धोकादायक विद्युत खांब बदलण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समिती तसेच डोंगरी विकास योजनेतून निधी उपलब्ध करून अनेक गावांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे चव्हाणवाडीसारख्या जीवितास धोका निर्माण झालेल्या गावाकडे मात्र महावितरण विभाग डोळेझाक का करत आहे, असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, चव्हाणवाडीतील परिस्थिती अत्यंत गंभीर असून येथे तातडीने प्रस्ताव तयार करून पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती किंवा डोंगरी विकास योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून हे धोकादायक खांब बदलणे सहज शक्य आहे. मात्र महावितरण प्रशासनानेच आवश्यक हालचाली न केल्याने हा प्रश्न रखडल्याची भावना व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या जीविताच्या प्रश्नात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला जावू नये, वेळेत उपाययोजना करून भविष्यातील दुर्घटना टाळावी अन्यथा होणाऱ्या नुकसानीची नैतिक जबाबदारी महावितरण अधिकाऱ्यांवर राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news