

कराड : धोंडेवाडी (ता. कराड) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोन्ही मंडळांनी वापरलेला डीजे, बँड जीप आणि ट्रॅक्टर-ट्रॉली असा सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजता धोंडेवाडी येथील नवभारत गणेश मंडळ आणि धनराज गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक मंदिर चौकात आली होती. त्यावेळी मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. दरम्यान, एका मंडळाच्या सदस्यांनी मिरवणुकीजवळ फटाक्यांची माळ लावल्याने वाद वाढून दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
पोलिसांनी नवरभारत गणेश मंडळाचा डीजे आणि धनराज गणेश मंडळाचा बँड बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संबंधितांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन केले नाही. मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने कृत्य केल्याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८९/२०२६, भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ (ब) व १९४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याच्या अनुषंगाने दोन्ही मंडळांकडील डीजे, बँड जीप आणि ट्रॅक्टर-ट्रॉली असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान मानवी जीवितास अपायकारक ठरेल असे कोणतेही कृत्य करू नये, हुल्लडबाजी करू नये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील तसेच पोलीस हवालदार शशिकांत काळे, तानाजी बागल, अर्जुन पाचुपते, शरद चव्हाण, आकाश फडतरे आणि उमेश गुरव यांनी केली. दरम्यान घारेवाडी ता. कराड येथील एका बँन्जो पथकावर कराड शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.