

मेढा : जावळी तालुक्यातील कुडाळ परिसरात धोम उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या चोवीस तासांपासून कालव्याचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने कुडाळ-मेढा-पाचगणी मार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सध्या तालुक्यात अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याने पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कालवा फुटल्यानंतर परिसरातील शेतांमध्ये तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, कालव्यातून बाहेर पडलेले पाणी तब्बल पाच किलोमीटरपर्यंत पसरल्याने परिसरातील काही ओढे व नाले तुंबल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेतीपिकांनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कालव्याची दुरुस्ती करावी आणि पाण्याची होणारी नासाडी त्वरित थांबवावी, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.