

तुषार देशमुख
सणबूर ः ढेबेवाडी - काळगांव परिसरात ऊसतोडीचा हंगाम म्हणजे उत्साह, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा काळ. पण या हंगामासोबतच दरवर्षी एक अदृश्य संकट येते आणि ते म्हणजे रिफ्लेक्टरविना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा बेफाम सुळसुळाट. रस्त्यांचे रुंदीकरण, प्रशासनाचे नियोजन असूनही ढेबेवाडी परिसरात ऊस वाहतूकदारांकडून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
ढेबेवाडी - कराड मार्गाचे रुंदीकरण हे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने झालेल्या मोठ्या कामांपैकी एक. या मार्गाचे डांबरीकरण आणि रुंदीकरण झाल्यामुळे वाहनांची वहिवाट सुलभ झाली. व्यापारी हालचाल वाढली, आणि परिसराच्या विकासाला वेग आला. पण विरोधाभास असा की, हाच रस्ता आता रिफ्लेक्टरविना ऊस वाहतुकीमुळे अपघातांचा मार्ग बनू लागला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी रस्त्याची सोय केली, पण वाहतुकीची जबाबदारी वाहनमालकांनी घेतली नाही. रस्ते चकाचक झाले. परंतू रात्रीच्या वेळी ढेबेवाडी परिसरातील रस्त्यांवर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्रेलर रिफ्लेक्टरविना, लाईटविना, अनेकदा जड ऊसाने ओथंबून भरलेले दिसतात.अंधारात ते वाहन दूरून दिसतच नाहीत. मागून येणाऱ्या वाहनांना अंदाज येण्याआधीच धडक होते, आणि क्षणात जीव गेला की आयुष्यभराचे दुःख उरते. अशा अनेक अपघातांनी मागील काही हंगामात निरपराध लोकांचे प्राण घेतले, पण प्रशासन आणि वाहतूक विभागाचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत.
वाहतूक नियमांनुसार प्रत्येक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर मागे लाल रंगाचे रिफ्लेक्टर, पुढे पांढरे रिफ्लेक्टर, ब्रेकलाईट, इंडिकेटर, आणि क्रमांकफलक व्यवस्थित असण्याची बंधने घालत आहे. तरीही ढेबेवाडी, मालदन, गुढे, तळमावले, काढणे, मानेगांव, काढणे, तारुख, कुसुर, कोळेवाडी, कोळे, विंग या परिसरात रस्त्यांवर फिरणारी बहुतेक वाहने या नियमांचा विचार करत नाहीत.ओव्हरलोडिंग, डबल ट्रेलर, अनुभवहीन चालक, परवाना नसलेले ड्रायव्हर - ही सगळी घातक वास्तवं रोज नजरेसमोरून जातात, पण दुर्दैवाने हे कोणीच थांबवत नाही. एका ट्रॅक्टरला दोन-दोन ट्रेलर जोडून ऊस लादला जातो. वाहनांचा वेग वाढतो, नियंत्रण कमी होते, आणि छोटासा उतारामुळे दुर्घटना घडत आहेत. चालक अनेकदा शेतकऱ्यांची तरूण मुलेे असतात. त्यांना प्रशिक्षण, अनुभव नसतो. तसेच परवानाही नसतो अशा परिस्थितीत अपघात घडले तर त्याला कोण जबाबदार?
प्रत्येक ऊसहंगाम सुरू होण्यापूर्वी वाहतूक विभाग आणि पोलीस थोड्या काळासाठी मोहीम राबवतात. काही वाहनांवर दंड आकारला जातो आणि नंतर सर्वकाही पुन्हा पूर्ववत सुरू होते. या बेपर्वाईमुळे ढेबेवाडी - कराड रस्त्यावर दरवर्षी हंगामी अपघातांचे प्रमाण वाढते. प्रशासनाने जर सतत आणि कठोर पाळत ठेवण्याची मागणी होत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने रस्त्यांचे रुंदीकरण झाले, हा नक्कीच स्वागतार्ह विकास आहे.परंतु या रस्त्यांवरून रिफ्लेक्टरविना ऊसवाहक वाहने भरधाव धावत आहेत. रस्ता रुंद झाला पण तो रस्ता अपघातमुक्त, सुरक्षित आणि जबाबदार बनवणे तितकेच आवश्यक आहे. विना रिफ्लेक्टर ऊस वाहतूकदारांवर कारवाई करावी, अशी मागाणी करण्यात आली आहे.तसेच कारखानदारांनीही जबाबदारी घेण्याची मागणी होत आहे.