Satara Robbery : ढेबेवाडी बाजारपेठेत भरदिवसा ज्वेलर्सवर डल्ला

तीन वस्तू लंपास करून पोबारा पाठलाग करणाऱ्यांच्या डोळ्यांत चटणी फेकून चोरटे पसार
Jewellery Theft
Jewellery Theft file photo
Published on: 
Updated on: 

सणबूर : ढेबेवाडी बाजारपेठेत भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. ग्राहक असल्याचा बनाव करून दुकानदाराची नजर चुकवून तीन वस्तू लंपास केल्या. त्यानंतर साथीदारासोबत पलायन करताना पाठलाग करणाऱ्यांच्या डोळ्यांत चटणी फेकून त्यांना रोखण्याचा धक्कादायक प्रकारही घडला. गजबजलेल्या बाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने व्यापारी वर्ग हादरला असून, चोरट्यांचे वाढते धाडस पाहता सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ढेबेवाडी बाजारपेठेतील मगर बंधू ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानात दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विनोद मगर यांचे या बाजारपेठेत अनेक वर्षांपासून ज्वेलर्सचे दुकान आहे. घटनेच्या वेळी विनोद मगर, त्यांचा मुलगा विराज आणि दोन कामगार दुकानात उपस्थित होते. बाजारपेठेतील नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या व्यवहारांच्या गर्दीत चोरट्यांनी संधी साधत चोरीचा डाव साधला.

मिळालेल्या माहितीनुसार, चांगल्या पोशाखातील एक तरुण वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आला. त्याने दुकानातील विविध वस्तू हाताळण्यास सुरुवात केली. वस्तूंच्या किमती विचारणे, त्या पाहणे आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कोणाला तरी दाखवणे, अशा प्रकारे तो बराच वेळ व्यवहारात गुंतल्याचे भासवत होता. दुकानातील मंडळी त्याला वस्तू दाखवण्यात व्यस्त असतानाच त्याने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि संधी साधली.

क्षणाचाही विलंब न करता त्याने दुकानातील तीन वस्तू उचलल्या आणि बाहेरच्या दिशेने धूम ठोकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुकानातील मंडळींना सावरायलाही वेळ मिळाला नाही. चोरी करून पळणाऱ्या तरुणाच्या हालचालींवरून त्याच्या साथीदाराचीही या प्रकारात भूमिका असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

साथीदार दुचाकी घेऊन तयार; चोरीनंतर क्षणात पलायन!

दुकानाबाहेर काही अंतरावर दुसरा तरुण दुचाकी घेऊन तयार थांबला होता. दुकानातून बाहेर पडलेल्या चोरट्याने थेट दुचाकी गाठली आणि दोघांनीही वेगाने पलायन केले. हा प्रकार लक्षात येताच विराज मगर, मगर बंधू आणि गोरख मोहिते या धाडसी युवकासह अन्य काही तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.

चोरट्यांना पकडण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा पाठलाग घाटमार्गापर्यंत पोहोचला. मात्र, चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्यांना चकवा देण्यासाठी धक्कादायक मार्ग अवलंबला. पाठीमागून येणाऱ्या विराज मगर आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य एका व्यक्तीच्या डोळ्यांत चटणी फेकली.

घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा आणि पुढील तपासाची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, चोरट्यांच्या पलायनाचा मार्ग आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news