

कोरेगाव : महाबळेश्वर-विटा या राज्य मार्गावरील रहिमतपूर ते सातारा या रस्त्याचे दर्जेदार काम झाले आहे. मात्र, धामणेर गावाच्या अलीकडे असणारा रेल्वे पूल म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. हा पूल अरुंद बांधण्यात आल्याने केवळ सिंगल वाहतूक करता येते. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला पुलाच्या प्रारंभी मोठ मोठे खड्डे असल्याने वाहने आदळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे टायर फुटल्याने अपघात होत आहे. याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
रहिमतपूर ते सातारा या रस्त्याच्या डांबरीकरणाला काही वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही रस्त्याचे काम परिपूर्ण झालेले नाही. चिंचणेर वंदन येथील रस्ता अद्याप अपूर्णच आहे. तसेच रहिमतपूर येथील रेल्वे स्टेशनच्या फाटकावर उभारलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही तोंडाला मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचते. ये जा करणार्या वाहनधारकांना पाण्यामुळे सुमारे फूट ते दीड फूट पडलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे पाणी साचलेल्या खड्ड्यात गाडी आपटून नुकसान होत आहे. नव्यानेच या रस्त्याला ये-जा करणारे वाहने या खड्ड्यात आदळून अपघात होत आहेत. अनेक दुचाकी चालकांचा या ठिकाणी अपघात होवून ते जायबंदी झाले आहेत.
या रस्त्यावर गेल्या चार-पाच वर्षात प्रचंड वाहतूक वाढली आहे. याच पुलावर केवळ सिंगल वाहतूक होत असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. तसेच रस्त्याच्या डागडुजीकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे खड्डे भरून घेण्याची विनंती केली असता, ते आमच्या हद्दीत येत नाहीत, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात, असे सांगून टोलवा टोलवी करतात.