Shivendraraje Bhosale| सातारा जिल्‍हा बँकेच्‍या चाव्‍या शिवेंद्रराजेंच्‍याच हातात

मकरंदआबा - रामराजेंसोबतचा ‘वारंगुळा’ टिकणार का?
Shivendraraje Bhosale
नेमकं काय ठरलंय? : सातार्‍यात चर्चा आहे ‘त्‍यांचं ठरलंय’ पण नेमकं काय ठरलंय हे सांगणार्‍या देवेंद्र फडणवीस व शिवेंद्रराजे भोसले यांच्‍या कानगोष्‍टी.
Published on
Updated on

हरिश पाटणे

सातारा : सातारा जिल्‍ह्याच्‍या राजकारणाची केंद्रबिंदू असलेल्‍या सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत परिवर्तन घडवून भाजपची सत्ता आणण्‍याचे मनसुबे भाजपच्‍या पक्षश्रेष्‍ठींनी रचले आहेत. सर्वाधिक ठराव मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्‍याकडेच असल्‍याने सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या सत्तेच्‍या चाव्‍या शिवेंद्रराजेंच्‍याच हातात आहेत. शिवेंद्रराजेंखालोखाल ठराव संख्‍या असलेल्‍या मंत्री मकरंदआबा पाटील व रामराजे ना. निंबाळकर यांच्‍या सोबतचा ‘वारंगुळा’ शिवेंद्रराजे टिकवणार की ‘शिवाळ’ मोडून नवा ‘पैरा’ करणार याविषयी राज्‍याच्‍या राजकारणात उत्‍सुकता आहे.

स्‍व. यशवंतराव चव्‍हाण, स्‍व. किसन वीर आबा यांनी महाराष्‍ट्राचे नेतृत्‍व केले ते सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत बसूनच. या दोन्‍ही महान नेत्‍यांच्‍या कडक शिस्‍तीत सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे रोपटे वटवृक्षाकडे झेपावले. स्व. वि‍लासकाका पाटील - उंडाळकर व स्‍व. अभयसिंहराजे भोसले या दोघांनीही सहकाराचा आदर्श ठेवत बँक वाढवली. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून सामान्‍य माणूस केंद्रबिंदू मानत बँकेला नाबार्डचे पुरस्‍कार मिळवून दिले. त्‍यानंतर रामराजे ना. निंबाळकर व स्‍व. लक्ष्‍मणराव पाटील या जोडगोळीने सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचा वारु चौखुर उधळत ठेवला. आता मात्र सातारा जिल्‍ह्याच्‍या राजकारणात कमालीची स्‍थित्‍यंतरे आली आहेत. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी सातारा जिल्‍हा परिषद व सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक टार्गेट करत काँग्रेस - राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या पायालाच हात घातला.

जिल्‍हा परिषदेत झालेल्‍या अभूतपूर्व कांडानंतर आता सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेतही दररोज लक्षवेधी घटना घडत आहेत. भाजपच्‍या पक्षश्रेष्‍ठींना जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक एकहाती ताब्‍यात हवी आहे. इथे तर भाजपचे नेते व राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्‍या नेतृत्‍वाखालील संस्‍थांचेच ठराव जास्‍त आहेत. त्‍यामुळे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, आ. महेश शिंदे, आ. धैर्यशील कदम, रणजितसिंह निंबाळकर, सत्‍यजितसिंह पाटणकर, मदनदादा भोसले या भाजपच्‍या नेतेमंडळींचा शिवेंद्रराजे भोसले यांच्‍यावर भाजपच्‍या एकतर्फी सत्तेसाठी दबाव आहे.

२१ संचालकांच्‍या सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत दि. ५ ऑगस्‍टपर्यंत २१७३ ठराव झाले आहेत. सातार्‍यातून ४७६, जावलीतून ६९, वाईतून १४२, खंडाळ्यातून ८९, महाबळेश्‍वरमधून ५१, कराडातून ३३३, फलटणमधून २५६, पाटणमधून १९७, खटावमधून १५०, कोरेगावमधून १२७, माणमधून १२२ तर दूध संस्‍थांमधून १६१ ठराव झाले आहेत. झालेले ठराव पाहता व भाजप नेत्‍यांचे असलेले वर्चस्‍व लक्षात घेता नियोजनबद्ध कार्यक्रम आखला तर भाजप सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत परिवर्तन घडवू शकेल, अशी वास्‍तव परिस्‍थिती आहे.

दुसर्‍या बाजूने राष्‍ट्रवादीचे मंत्री मकरंदआबा पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. नितीनकाका पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांची एकत्रित मोट बांधली गेली तर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या निवडणुकीत संघर्ष अटळ आहे. निवडणूकही अटीतटीची होवू शकते. अनेक सोसायटी मतदार संघांमध्‍ये घनघोर लढाया होवू शकतात. पैशांचा महापूर, पळवापळवी, हाणामारी असे प्रकार होवून जिल्‍हा परिषदेपेक्षा भयावह परिस्‍थिती जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या निवडणुकीवेळी निर्माण होवू शकते. अशा परिस्‍थितीत पूर्वीचाच वारंगुळा कायम ठेवत शिवेंद्रबाबा आणि मकरंदआबा एकत्र येवू शकतात का? याविषयीसुद्धा चाचपणी सुरु आहे. अर्थात भाजपच्‍या पक्षश्रेष्‍ठींचा व जिल्‍ह्यातील नेत्‍यांचा वाढत असलेला दबाव बाजूला ठेवत शिवेंद्रबाबा मकरंदआबा बँकेसाठी एकत्र येतील का? अशा परिस्‍थितीत शंभूराज देसाई यांची भूमिका काय राहील? शिवेंद्रबाबा, मकरंदआबा, रामराजे यांची युती जयकुमार गोरे कशी स्‍वीकारणार? हे सारेच प्रश्‍न तयार होणार आहेत. त्‍यामुळे वारंगुळा कायम राहणार की ‘शिवाळ’ तुटणार यावर सातारा जिल्‍ह्याच्‍या शेतकर्‍यांच्‍या या अर्थवाहिनीचे भवितव्‍य अवलंबून आहे.

दि. ५ ऑगस्‍ट रोजी ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्‍हा जिकडे शिवेंद्रराजे तिकडे जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेची सत्ता हे समीकरण तर ‘फिट्ट’ झाले आहे. राजकारणात अत्‍यंत चाणक्‍यनीती वापरणारे शिवेंद्रराजे हे सारे कौशल्‍याने कसे हाताळतात हे पाहणे राजकीयदृष्‍ट्याही औत्‍सुक्‍याचे आहे. शिवेंद्रराजेंच्‍या राजकीय मुत्‍सद्देगिरीची ही अग्‍निपरिक्षा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news