

सातारा : जिल्हा बँकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार भाजप निवडणूक लढवत असताना सहकारी पक्ष म्हणून महायुतीतल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहेत. या निवडणुकीत भाजपचा सन्मान राहणे महत्वाचे आहे. सन्मानजक प्रस्ताव न आल्यास आणि मार्ग निघाला नाही तर ना. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीला सामोरे जाईल, अशी भूमिका ना. जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
ना. जयकुमार गोरे म्हणाले. ना. मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करताना जिल्हा बँकेच्या कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही. पाठीमागे काय घडामोडी घडल्या, आमच्यामध्ये समज गैरसमज होते ते गैरसमज निघावेत, अशा पध्दतीने चर्चा व्हावी. चर्चेचा निरोप मला त्यांच्याकडून आला. मी पण त्यांना सांगितले आपण काय दुश्मन नाही. समन्वयाने एकत्र बसू शकतो. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेची झालेली निवडणूक असेल किंवा मतदारसंघातील वेगळे विषय असतील त्या विषयावर आमची चर्चा झाली.
जिल्हा बँकेचा विषय निघाला तेव्हा भाजपाच्यावतीने चर्चा करण्याचा अधिकार ना. शिवेंद्रराजे भोसले यांना दिलेला आहे. जिल्हा बँकेसंदर्भात चर्चा ना. शिवेंद्रराजे भोसले व आ. धैर्यशील कदमच चर्चा करतील. कार्यक्रम करायचा असेल तर तो चांगल्या मुहूर्तावर करायचा असतो, असा इशाराही त्यांनी दिला.