

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये ११ सोसायटी मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करू व उर्वरित १० मतदार- संघांमधील जागावाटप चर्चेने करू, असा प्राथमिक तोडगा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकाराने साताऱ्यात झालेल्या महायुतीच्या बैठकीत निघाला. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंदआबा पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर यांनीही या चर्चेत प्रतिसाद दिला. त्यामुळे आता ११ सोसायटी मतदारसंघांमध्ये घमासान दिसेल, तर उरलेल्या १० मतदार- संघांमध्ये अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत खलबते सुरूच राहतील.
बँकेत महायुती म्हणून एकत्र या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर रविवारी ‘बाबा व आबा एकत्र बसले,’ तर सोमवारी लगेचच शिवेंद्रराजेंच्या पुढाकाराने मॅरेथाॅन बैठका झाल्या. हॉटेल प्रीती येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ना. मकरंदआबा पाटील, आ. रामराजे नाईक निंबाळकर, खा. नितीन पाटील, आ. धैर्यशील कदम, माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, कांचन साळुंखे आदी नेते उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई हे साताऱ्यात नसल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. प्रत्यक्ष चर्चा तीन प्रमुख नेत्यांनीच केली. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवल्यास जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार, कोणत्या मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार, यावर प्राथमिक चर्चा झाली. सोसायटी मतदार संघांमध्ये मैत्रीपूर्ण लढायचे आणि उर्वरित १० मतदारसंघांत जागावाटप करून निवडणुकीला सामोरे जायचे असे ठरले. राखीव जागांमधील काही नावांची चर्चाही झाली. मात्र, त्यावर अंतिम निर्णय झाले नाहीत. पुन्हा एकदा बैठक करून फॉर्म्युला ठरवण्यात येणार आहे. बँकेच्या राखीव मतदारसंघासाठी वाटाघाटी सुरू आहेत. महायुतीतील सर्व नेत्यांशी समन्वय साधून बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने आमची प्राथमिक चर्चा झाली. महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाणार आहे. सोसायटी मतदारसंघ हा जो-तो आपापल्या ताकदीवर लढत असतो. तेथे पॅनल नसतात, पूर्वीपासून चालत आलेली तीच पद्धत पुढेही राहणार आहे. राखीव १० जागा असून, पॅनल म्हणून त्यांचे वाटप कसे करायचे? यावर लवकरच चर्चा होणार आहे. जागावाटपबाबत अद्याप ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री जयकुमार गोरे आणि आ. रामराजे यांच्यात कसा समन्वय साधणार असे विचारले असता. शिवेंद्रराजे म्हणाले, कुठेही एकमेकांमध्ये थोडेफार मतभेद राहतात. महायुती म्हणून काम करताना बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको, म्हणून सर्वांनीच सामंजस्य दाखवले पाहिजे. महायुती म्हणून निवडणूक लढवा, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत. मतभेद सगळीकडेच असतात. पण, त्याला ब्रेक लावून पुढे जायला लागेल. मंत्री मकरंद पाटील हे पालकमंत्र्यांशी काल बोलले होते. पालकमंत्र्यांना मुंबईला जावे लागले. त्यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. कुठेही संघर्ष न करता महायुती म्हणून निवडणूक लढवण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांच्या आहेत. मंत्री जयकुमार गोरेही आमच्यासोबत आहेत. बैठकीला रामराजे होते म्हटल्यावर ते महायुतीसोबतच आहेत, असं म्हणावे लागेल, असेही शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले. बँकेच्या सोसायटी मतदारसंघाचे मतदार सहलीला गेल्याने दुष्काळी यादीतून जावळीला वगळले, असा आरोप होत आहे, असे विचारले असता शिवेंद्रराजे म्हणाले, सोसायटी मतदारसंघाचे कुणीही सहलीला नाही. मात्र, ज्यांचे ठराव नाहीत त्यांना ते बाहेर गेले आहेत असे वाटते. ज्यांचे ठराव नाहीत त्यांना ठरावधारक भेटत नसल्याने काही नेते फार आटापिटा करत आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
खा. उदयनराजेंच्या भूमिकेबाबत छेडले असता. शिवेंद्रराजे म्हणाले, खा. उदयनराजे हे भाजपमध्ये असून, त्यांच्याबद्दल वेगळी काय भूमिका घेणार? स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्वजण स्थानिकच बसलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.