Satara Politics : माणमध्‍ये ना. जयकुमार गोरेंविरोधात कोण?

तिरंगी हायव्‍होल्‍टेज सामना रंगणार : शेखर गोरे, मनोज पोळ यांचीही तयारी
Satara DCC Bank Election
सातारा जिल्‍हा बँक निवडणूक
Published on: 
Updated on: 

राजेश इनामदार

दहिवडी : सातारा जिल्‍हा बँकेसाठी माण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक शेखर गोरे व स्व. सदाशिवराव पोळ यांचे चिरंजीव मनोज पोळ यांच्या नावांची चर्चा आहे. माण तालुक्यातील जिल्हा बँकेची निवडणूक नेहमीच चुरशीची ठरते. यावेळीही ना. जयकुमार गोरे यांच्या विरोधात अंतिम उमेदवार कोण असेल, तसेच शेखर गोरे व मनोज पोळ यांच्यातील समीकरण काय राहील, याची उत्सुकता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निमित्ताने माणचे राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.

माण तालुक्यातील ठराव प्रक्रिया पार पडत असताना तीनही राजकीय मातब्बरांकडून आपापल्या बाजूने ठराव करण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. ठराव प्रक्रियेत ना. जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी अनेक ठराव आपल्या बाजूने केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा अधिक जोरात आहे. दुसरीकडे शेखर गोरे यांनी जिल्हा बँक निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या जिल्हा बँक निवडणुकीत शेखर गोरे व मनोज पोळ यांच्यातील लढतीत दोघांनाही समान ३६ मते मिळाली होती. अखेर चिठ्ठीचा कौल शेखर गोरे यांच्या बाजूने लागला आणि ते संचालक झाले. त्यामुळे यावेळी ठराव प्रक्रियेत झालेली उलटफेर आणि वाढलेली राजकीय चुरस पाहता माणच्या जिल्हा बँक निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. मनोज पोळ यांनीही ठराव प्रक्रियेत सहभागी होत अनेक ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने करण्यासाठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे निवडणूक तिरंगी होणार की ऐनवेळी कोण माघार घेणार, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ओबीसी मतदारसंघातून ना. जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभापती विक्रम शिंगाडे यांचे नाव पुढे येत आहे. तर औद्योगिक विणकर व मजूर संस्थांमधून जिल्ह्यातून एक संचालक निवडून द्यायचा आहे. या मतदारसंघातून संचालक असलेले अनिल देसाई यांना तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी ना. जयकुमार गोरे यांनी अनेक ठराव आपल्या बाजूने केल्याची चर्चा आहे.

वरकुटे मलवडी येथील माणगंगा औद्योगिक सहकारी संस्थेतून अनिल देसाई, महेंद्र मजूर सहकारी संस्थेतून अपर्णा देसाई, वावरहिरे येथील भैरवनाथ मजूर सहकारी संस्थेतून शेखर गोरे, माण तालुका औद्योगिक विकास ग्रामोद्योग संस्थेतून अरुण गोरे, तर वरकुटे मलवडी येथील पाणीपुरवठा सहकारी संस्थेतून जयकुमार गोरे यांचा ठराव झाला आहे. सावता माळी सहकारी पाणीपुरवठा संस्थेतून माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा ठराव मंजूर झाल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडेही लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news