Satara DCC Bank : खंडाळ्‍यात आबा-भाऊंच्‍या लढाईत कुणाची बाजी ?

राष्‍ट्रवादी व भाजपकडूनही विजयाचा दावा : मतदारांचा कौल ठरणार निर्णायक
Satara DCC Bank
Satara DCC Bank
Published on: 
Updated on: 

शशिकांत जाधव

लोणंद : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खंडाळा तालुका सोसायटी मतदारसंघाची लढत चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय भोसले आणि भाजपचे अनिरुद्ध गाढवे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचा फैसला आज मंगळवारी होणार आहे. सर्वच्या सर्व ५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने आता या मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे- प्रतिदावे केले जात आहेत.

खंडाळा सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अजय भोसले आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध गाढवे यांच्यात थेट लढत झाली. सुरुवातीला राष्ट्रवादीचेच ॲड. शामराव गाढवे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुक तिरंगी संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी बंडाचे निशाण खाली घेत पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात सामील होण्याची भूमिका घेतल्याने निवडणुकीचे चित्र बदलले. त्यामुळे प्रत्यक्षात अजय भोसले विरुद्ध अनिरुद्ध गाढवे अशी दुरंगी लढत झाली.

या निवडणुकीत ना. मकरंद पाटील यांनी सुरुवातीपासूनच लक्ष घातले होते. राष्ट्रवादीच्या सहलीवर गेलेल्या ३० पेक्षा अधिक मतदारांना सुरक्षितपणे खंडाळ्यात आणून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मतदारांची वाहतूक, नियोजन आणि मतदान केंद्रापर्यंतची व्यवस्था यामध्ये आबांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे काही दगा फटका होणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. तर भाजपाच्या गोटातील काही मतदार आपलेसे करण्यात यश मिळवले असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे ना. जयकुमार गोरे यांनीही निवडणूक गांभीर्याने घेतली. फलटण परिसरातून भाजपच्या मतदारांना खंडाळ्यापर्यंत आणण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र दिसले. राष्ट्रवादीच्या गोटात शिरून आवश्यक मतदार गळाला लावले असल्याचा दावा केला जात आहे. म्हणूनच विजयाचे गणित भाजपा कडून मांडले जात आहे.

या निवडणुकीत सर्व ५० मतदारांनी मतदान केल्याने एकही मत निर्णायक ठरू शकते. राष्ट्रवादीकडून आपल्याकडे भक्कम संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे, तर भाजपकडूनही विजयाचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीत उमेदवार पक्षाचे असले तरी ना. मकरंदआबा व ना. जयाभाऊ यांच्‍यातच लढाई होणार आहे. ॲड. शामराव गाढवे यांच्‍या भूमिके राष्‍ट्रवादीला फटका बसणार की फायदा होणार, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्‍हा बँकेत अजय भोसले बाजी मारणार की अनिरुद्ध गाढवे धक्कादायक निकाल देणार? आबांचा करिश्मा कायम राहणार की भाऊंची रणनीती यशस्वी ठरणार? खंडाळ्याच्या राजकारणातील या प्रतिष्ठेच्या लढाईच्‍या फैसल्‍याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.