Satara News : वाईत पाऊस गायब, पिके करपली

शेतकरी होरपळतोय; प्रशासन, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह
Satara News : वाईत पाऊस गायब, पिके करपली
Published on: 
Updated on: 

वाई : वाई तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष शेतात दुष्काळी परिस्थिती असताना तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळण्याचे निकष कोणते, याचे उत्तर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी द्यावे, अशी मागणी होत आहे.

जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, घेवडा, चवळी, मूग, तीळ व सूर्यफूल यांसारखी पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असून, बियाणे, खते, औषधे, मजुरी व मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

वाई तालुक्याच्या पश्‍चिम भागात धरणे असूनही त्याचा थेट फायदा अनेक शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना होत नाही. धरणे आहेत म्हणून दुष्काळ नाही, असा कागदी हिशेब न करता प्रत्यक्ष पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा, पावसातील खंड व पिकांचे नुकसान यांचा सर्वंकष विचार करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, काही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याने पीक पाहणीच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. अनेक शेतकऱ्यांची अद्याप पीकपाहणी झालेली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नुकसानीची अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचणार कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुष्‍काळासाठी पाठपुरावा कधी?

कृषी व महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या दारात जाणारे राजकीय नेते आता त्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून दुष्काळाच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news