Satara DCC Bank : डीसीसीच्या २१ मतदारसंघांत ‘घडलंय-बिघडलंय’

कुठे घराण्यांचा प्रभाव, कुठे बंडखोरीचा इतिहास : यंदा समीकरणे बदलण्याची शक्यता
Satara DCC Bank
Satara DCC Bank Pudhari photo
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून २१ संचालकपदांसाठी मोठी राजकीय मोर्चेबांधणी झाली आहे. यामध्ये ११ तालुका सोसायटी, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, नागरी बँका-पतसंस्था, गृहनिर्माण व दूध, औद्योगिक-विणकर-मजूर, महिला राखीवच्या दोन जागा तसेच अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त-भटक्या जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्ग अशा मतदारसंघांचा समावेश आहे.

२०२१ च्या निवडणुकीत २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दहा जागांवर झालेल्या लढतींमध्ये जावली, कोरेगाव, माण आणि खटाव येथे अधिकृत उमेदवारांना धक्के बसले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत केवळ पक्षीय ताकद नव्हे, तर स्थानिक सहकारातील गट, व्यक्तीगत संबंध आणि बंडखोरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने चेक देत आपले उमेदवार उभे केले आहेत. महायुतीची बोलणी करताना राखीव मतदारसंघातील सर्वाधिक जागा भाजपला खेचून आणण्याची ही खेळी मानली जात आहे.

सातारा तालुका सोसायटी - शिवेंद्रराजेंचा पारंपरिक बालेकिल्ला

सातारा तालुक्‍यावर पूर्वीपासूनच दिवंगत सहकार मंत्री अभयसिंहराजे भोसले यांचे वर्चस्‍व होते. जिल्‍हा बँकेच्‍या राजकारणात त्‍यांचा मोठा प्रभाव होता. केवळ सोसायटीच नाही तर इतर सर्वच मतदारसंघांमध्‍येही असलेल्‍या मताधिक्‍क्‍यामुळे भाऊसाहेब महाराजांचे प्रभुत्‍व कायम होते, त्‍यांच्‍यानंतर डीसीसीमध्‍ये त्‍यांचे चिरंजीव ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा वरचष्‍मा राहिला आहे. सातारा सोसायटी मतदारसंघातून २०२१ मध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले बिनविरोध निवडून आले होते. जिल्हा बँकेच्या राजकारणात या मतदारसंघाला विशेष महत्त्व असून शिवेंद्रराजेंचा सहकारातील प्रभाव या मतदारसंघाच्या राजकारणात सातत्याने दिसतो. यंदा मात्र भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीतील इच्छुकांमुळे जागावाटपाचे गणित महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीमध्‍ये काँग्रेसचे नेते बाबासाहेब कदम यांनी त्‍यांना आव्‍हान दिले असले तरी ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रभाव पाहता ही निवडणूक त्‍यांच्‍यासाठी अवघड राहिलेली नाही.

वाई तालुका सोसायटी - पाटील कुटुंबाचा प्रभाव

वाई तालुक्‍यासह जिल्‍ह्याच्‍या राजकारणावर स्‍वर्गीय खा. लक्ष्‍मणराव पाटील यांचा प्रभाव राहिला आहे. थोर स्‍वातंत्र्य सैनिक किसन वीर यांच्‍या तालमीत तयार झालेल्‍या लक्ष्‍मणतात्‍यांनी दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्‍या साथीने जिल्‍हा बँक नावारुपास आणली. त्‍यांचाच वारसा मंत्री मकरंदआबा पाटील व खा. नितीन पाटील पुढे चालवत आहेत. वाई सोसायटी मतदारसंघातून २०२१ मध्ये खा. नितीन पाटील बिनविरोध झाले. याच निवडणुकीत वाईशी संबंधित मकरंद पाटील खरेदी-विक्री संघातूनही बिनविरोध झाले होते. त्यामुळे वाईच्या सहकार राजकारणात पाटील कुटुंबाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. यंदा खा. नितीन पाटील व ना. मकरंद पाटील यांना या मतदारसंघामध्‍ये भाजपचे दीपक ननावरे यांनी आव्‍हान उभे केले आहे. तर सत्‍यजीत वीर यांचाही उमेदवारी अर्ज दाखल आहे. भाजपने या ठिकाणी दबावतंत्र वापरल्‍याची चर्चा आहे.

कोरेगाव तालुका सोसायटी - एका मताची आणि चिठ्ठीची कहाणी

कोरेगाव सोसायटी मतदारसंघामध्‍ये राष्‍ट्रवादीचा कायमच प्रभाव राहिला. बँकेचे माजी उपाध्‍यक्ष सुनील माने हे या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, मागील निवडणुकीत आ. महेश शिंदे यांनी डाव पलटवत राष्‍ट्रवादीची मते फोडण्‍यात यश मिळवले होते. कोरेगाव सोसायटी मतदारसंघात राष्‍ट्रवादीचे शिवाजीराव महाडिक आणि आ. महेश शिंदे यांचे समर्थक सुनील खत्री यांना प्रत्येकी ४५ मते मिळाली. अखेर चिठ्ठीने सुनील खत्री विजयी झाले. राष्ट्रवादीच्या पारंपरिक प्रभावाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा निकाल कोरेगावातील अंतर्गत गटबाजीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. यंदा या मतदारसंघात जुने गट, स्थानिक नेतृत्व आणि महायुतीतील समन्वय याकडे लक्ष आहे. या खेपेला या मतदार संघातून सुनील खत्री यांच्‍या विरोधात सुनील माने अशीच लढत आहे.

जावली तालुका सोसायटी - शशिकांत शिंदेंना धक्का देणारा मतदारसंघ

जावली सोसायटी मतदारसंघावर दिवंगत आमदार लालसिंगराव शिंदे यांच्‍या घराण्‍याचा प्रभाव राहिला. त्‍यांच्‍यानंतर माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधीत्‍व केले. मात्र, २०२१ मध्ये शशिकांत शिंदे स्वतः जावली सोसायटीतून रिंगणात होते. मात्र ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी २५ विरुद्ध २४ अशा अवघ्या एका मताने त्यांचा पराभव केला. त्यामुळे जावली हा 'पक्षापेक्षा स्थानिक समीकरण महत्त्वाचे' ठरणारा मतदारसंघ म्हणून चर्चेत आला. यंदा पुन्‍हा एकदा ज्ञानदेव रांजणे यांच्‍याविरोधात शशिकांत शिंदे व त्‍यांचे समर्थक विठ्ठल गोळे यांनी मतांची जोरदार गोळाबेरीज करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. मात्र रांजणे यांची बाजू ठरावात वरचढ असल्‍याचे समजते. या मतदारसंघातील मतदारांना गेल्‍या महिनाभरापासून टूरवर पाठवल्‍याने जावली सोसायटीत काय होणार? याकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे.

खंडाळा तालुका सोसायटीत भाजप चमत्‍कार घडवण्‍याच्‍या तयारीत

ज्‍येष्‍ठ नेते व जिल्‍हा बँकेचे माजी अध्‍यक्ष बकाजीराव पाटील यांचा हा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. ना. मकरंद पाटील यांचा अनेक वर्षांपासून या तालुक्‍यावर प्रभाव आहे. गेल्‍या निवडणुकीमध्‍ये त्‍यांनी दत्तानाना ढमाळ यांना बिनविरोध निवडून आणले. यंदा मात्र भाजपने नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके-पाटील या मकरंद पाटलांच्‍या विरोधकांना ताकद दिली असल्‍याने इथे निवडणूक लागणार हे निश्‍चित आहे. राजेंद्र नेवसे, शामराव गाढवे, संतोष साळुंखे, अजय भोसले असे अनके उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. पण खरी लढत भरगुडे -पाटील व संतोष साळुंखे यांच्‍यातच होण्‍याची शक्‍यता आहे. कागदावर या मतदार संघात राष्‍ट्रवादी वरचढ असली तरी भाजप चमत्‍कार करण्‍याच्‍या तयारीत आहे. त्‍यामुळे खरी लढत मकरंद पाटील विरुद्ध जयकुमार गोरे अशीच आहे.

पाटण तालुका सोसायटी - देसाई - पाटणकरांमध्‍ये धुमशान

जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे पहिले अध्‍यक्ष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू ना. शंभूराज देसाई हे अनेक वर्षे बँकेत शिरकाव करण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहेत. मात्र, पाटण सोसायटी मतदारसंघावर प्रभाव असलेल्‍या पाटणकरांनी त्‍यांना यश मिळू दिलेले नाही. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्‍व राहिले आहे. २०२१ मध्ये पाटण सोसायटीत सत्यजित पाटणकर यांनी ५८ मते मिळवत ना. शंभूराज देसाई यांचा १४ मतांनी पराभव केला. पाटणमधील ही लढत पुन्हा जिल्हा बँक निवडणुकीतील प्रतिष्ठेच्या लढतींपैकी एक ठरली. ना. शंभूराज देसाई यंदाही आपली ताकद लावणार आहेत.

गृहनिर्माण व दूध- उदयनराजे बिनविरोध होणार

सातारच्‍या दोन्‍ही राजेंनी एकत्रित येत जिल्‍हास्‍तरावरचा हा मतदारसंघ आपल्‍या ताब्‍यात ठेवला आहे. खा. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्‍या विचारांचे ठराव या मतदारसंघामध्‍ये कायमच होत असल्‍याने उदयनराजे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजय होतात. २०२१ मध्ये खा. उदयनराजे भोसले बिनविरोध झाले होते. यंदाही त्यांनी याच मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गृहनिर्माण व दूध मतदारसंघात उदयनराजेंच्या नेतृत्वाचा प्रभाव हा प्रमुख संदर्भ ठरतो. यंदा डी. के. पवार यांनी अर्ज भरला असला तरी उदयनराजे व डी. के. पवार यांचे संबंध पाहता उदयनराजे बिनविरोध होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news