Satara News : सातार्‍यात ‘दिवसा उजेड’; पथदिव्यांमुळे विजेचा अपव्यय

पोवई नाका ते जुना आरटीओ चौक मार्गावर तीन महिन्यांपासून दिवे सुरूच; हजारो युनिट वीज वाया
Satara News |
पोवईनाका ते जुना आरटीओ चौक मार्गावर सकाळी उशीरपर्यंत पथदिवे सुरू होते. Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : शहरातील वीजबिल कमी करण्याच्या उद्देशाने लाखो रुपये खर्चून बसवण्यात आलेले एलईडी पथदिवेच आता प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या उधळपट्टीचे कारण ठरत आहेत. पोवई नाका ते जुना आरटीओ चौक या वर्दळीच्या मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत पथदिवे सुरूच राहत असल्याने ‘दिवसा उजेड’ असा प्रकार घडत आहे. संबंधित कंत्राटदार आणि पालिकेच्या विद्युत विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हजारो युनिट वीज अक्षरशः वाया जात असून, करदात्या नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील जुने सोडियम व्हेपर दिवे बदलून वीज बचतीसाठी ’प्रज्वल भारत’ या ठेकेदार कंपनीमार्फत एलईडी दिवे बसवण्यात आले. मात्र, बचतीचा उद्देश पूर्णपणे फसला आहे. पोवई नाका ते जुना आरटीओ चौकातील 50 विद्युत खांबांवर लावलेले 100 एलईडी दिवे वेळेवर बंद करण्याचे सेटिंगच केले गेले नाही. प्रत्येक दिवा 50 वॅटचा असून, रोज सकाळी 7 ते 9 या वेळेत दोन तास हे दिवे विनाकारण सुरू राहतात. यामुळे दररोज 5 हजार वॅट वीज वाया जात आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल 180 तास विजेचा अपव्यय झाला आहे, जो हजारो युनिटच्या घरात जातो.

‘वीज बचत म्हणजेच वीजनिर्मिती’ या तत्त्वाचा पालिकेच्या विद्युत विभागाला विसर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. कनिष्ठ अभियंता अविनाश शिंदे यांनी शहरात फिरून पाहणी केल्यास असे प्रकार टाळता येऊ शकतात. एकीकडे देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असताना, दुसरीकडे सुरू असलेला हा विजेचा खेळखंडोबा थांबवून प्रशासनाने जबाबदारीने वागावे आणि ही उधळपट्टी तातडीने थांबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news