

लोणंद : माऊलींच्या पादुकांना नीरा नदीतील दत्तघाटावर अभ्यंग स्नान घालण्यात येते. मात्र, नीरा नदीच्या दत्त घाटावर वीर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने संपूर्ण दत्तघाट पाण्याखाली गेला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत वीर धरणातील विसर्ग कमी करून नीरा दत्तघाटावरील पाणी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री 11 वाजता वीर धरणातून 30 हजार क्युसेक पाणी नीरा नदीत सोडल्याने दत्त घाटावरील दत्त मंदिरात झोपलेल्या सुमारे 250 वारकर्यांना प्रशासन व पोलिस प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवार, दि. 26 जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींचा प्रवेश झाल्यानंतर नीरा नदीच्या दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना अभ्यंग स्नान घालण्यात येते. गेल्या दोन दिवसांपासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणातून मोठा विसर्ग केल्याने नीरा नदीला पूर आला आहे. अचानक पाणी वाढल्याने मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास नीरा दत्त घाटावरील दत्त मंदिरामध्ये झोपलेल्या 200 ते 250 वारकर्यांना प्रशासन व पोलीस प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले. यावेळी प्रशासन व वारकर्यांची मोठी पळापळ झाली. यावेळी वाईचे प्रांत राजेंद्र कचरे, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले यांनी पाडेगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने त्वरित घटनास्थळी जाऊन वारकर्यांची मदत केली.
निरा नदीच्या दत्तघाटावर पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासन व पाडेगाव ग्रामस्थ अलर्ट झाले आहे. त्यांनी या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली. विसर्ग कमी झाल्यानंतर गुरूवार सकाळपर्यंत पाणी कमी होईल. त्यानंतर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यासाठी कोणताही अडथळा येणार नसल्याचे तहसिलदार अजित पाटील यांनी सांगितले. विसर्ग वाढवल्याने नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन जुन्या पुलापासून दत्त घाटाकडे जाणारा परिसर व मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या रस्ता व बॅरिकेट त्याचबरोबर दत्त घाटावरील सभामंडप हा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून दत्तगटावर जाण्यास सर्वांना प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी सातारा पोलिसांच्या वतीने पोलिस पहारा ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी ही या ठिकाणी 24 तास बसून आहेत.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दत्तघाटावर स्वच्छता, बॅरिकेट उभारणी, स्वागत कमान उभारणी करण्यात आली आहे. मात्र, पूराचे पाणी ओसरल्यानंतर चिखल निर्माण होणार आहे. हा चिखल काढून स्वच्छतेचे काम रात्री उशिरा करण्यात येणार आहे. पालखी सोहळा गुरुवारी जरी येत असला, तरी मंगळवारपासूनच नीरा नदीच्या दत्त घाटावर वारकर्यांची मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी वारकरी आंघोळ करून आपले कपडे धुण्याचे काम करत असतात. नीरा नदीचा दत्तघाट पाण्याखाली गेल्यामुळे वारकर्यांची मोठी कुचंबणा झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारीचा पालखी सोहळा येत असताना नीरा नदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कधीच आले नव्हते. यावर्षी प्रथमच हे पाणी आले आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पादुकांना अभ्यंग स्नान घालण्यासाठी वीर धरणातून पाणी सोडायला लागायचे. परंतु, यावेळी वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस पडत असल्याने नीरा नदीच्या नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.