

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, धोम, धोम बलकवडी, उरमोडी व तारळी धरणात ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम बलकवडी व कण्हेर धरणातून विसर्ग सोडण्यात आल्याने वेण्णा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणे भरण्यासाठी अजून मोठ्या पावसाची गरज आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणे भरण्यासाठी अजून मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. काेयना धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ७६.७३ टीएमसी असून धरण ७२.९० टक्के भरले आहे. धरणात २२ हजार ५३० क्युसेक पाण्याची आवक होत आहे.धोम धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ८.७८० टीएमसी असून धरण ७५.११ टक्के भरले आहे. धरणात ४ हजार १३८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
धोम बलकवडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ३.४२० टीएमसी असून धरण ८६.३६ टक्के भरले आहे. धरणात १ हजार ५४४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.तर धरणाच्या सांडव्यातून १ हजार ४६९ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. कण्हेर धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ८.८२० टीएमसी असून धरण ९१.९७ टक्के भरले आहे.
धरणात ३ हजार ६८३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणाच्या सांडव्यातून ४ हजार ४०९ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ७.८९० टीएमसी असून धरण ८१.७६टक्के भरले आहे. धरणात ३ हजार ५३३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तारळी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ४.३९० टीएमसी असून धरण ७५.१७ टक्के भरले आहे. धरणात २ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी ३०.६९ टक्के, नेर ६२.५० टक्के, राणंद १०.१८ टक्के, आंधळी ५४.९६ टक्के, नागेवाडी ६६.३५ टक्के, मोरणा ६५.४६ टक्के, उत्तरमांड ७०.५८ टक्के, महू ८०.५५ टक्के, हातगेघर ४७.६० टक्के, वांग मराठवाडी ७२.६५ टक्के पाणी साठा आहे. धरणे पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.