Satara Cylinder blast: सिलिंडरच्या स्फोटाने पत्र्याचे घर खाक

पॉवर हाऊसनजीकची घटना; ३ लाखांचे नुकसान
Satara Cylinder blast: सिलिंडरच्या स्फोटाने पत्र्याचे घर खाक
Published on
Updated on

सातारा : सातारा शहराजवळील यवतेश्‍वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पॉवर हाऊसनजीक असलेल्या एका पत्र्याच्या घरात शनिवारी सायंकाळी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्‍फोटात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राणी रामचंद्र साळुंखे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचे पाॅवर हाऊस परिसरात पत्र्याचे शेड असून त्या कुटुंबासह राहतात. नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण कामावर बाहेर गेल्याने घर बंद होते. सायंकाळी ६ च्या सुमारास घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, संपूर्ण परिसर हादरला.

या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी तत्काळ सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन त्यांनी ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी संपर्क साधत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार काही वेळातच अग्निशमन वाहन दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली.

स्फोटाच्या वेळी घरात कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेचा सिलिंडर स्फोटाचा थरारक क्षण नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news